उस्मानाबादी शेळीला "जीआय' मानांकनासाठी प्रयत्न

उस्मानाबादी शेळी
उस्मानाबादी शेळी

उस्मानाबाद : एकापेक्षा अधिक करडे (पिले) देणाऱ्या, मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळीच्या भौगोलिक मानांकन (जीआय) नोंदणीबाबत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाकडे अर्जही दाखल करण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न 
उस्मानाबादी शेळीची वाढ जलद होते. ही शेळी एकाचवेळी अनेक पिलांना जन्म देते. या शेळीच्या मांसाची सर्वदूर मागणी आहे. त्याशिवाय उत्तम दर्जाचे दूध आणि उमद्या श्रेणीचे चामडेही मिळते. शेळीपालन करणाऱ्यांसाठी या बाबी लाभदायी आहेत. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हमून शेळीपालनाच उत्तम साधन ठरू शकते.

उस्मानाबादी जातीचे जतन, गुणवत्ता टिकून ठेवण्यास "जीआय' (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकनामुळे मदत होईल. या बाबींचा विचार करून उस्मानाबादी शेळीला "जीआय' मानांकन मिळावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळात यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली. आताच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्याला चालना दिली आहे.

चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयामध्ये दोन डिसेंबरला अर्ज सादर करण्यात आला आहे. या प्रक्रियेतील तीन टप्पे पूर्ण झाले असून अखेरच्या, चौथ्या टप्प्यावरील कार्यवाही सुरू आहे. येत्या मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथील जीएसजीसी (आयपीआर) प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मदतीने ही प्रक्रिया केली जात आहे. 

मानांकन मिळाल्यास... 
हे मानांकन "जीआय' कायद्याअंतर्गत दिले जाते. हे मानांकन म्हणजे केंद्र सरकारने विशिष्ट भागातील उत्पादनाला किंवा पदार्थाला दिलेला क्वालिटी मार्क असतो, क्वालिटी टॅग मिळतो, उत्पादनाचे ब्रॅंडिंग होते, उत्पादनाला हमीभाव मिळण्याबरोबरच जगभरात बाजारपेठ उपलब्ध होते. आपल्या मालाला कायदेशीर अधिकारही मिळतो. "जीआय' मिळाल्यास 160 राष्ट्रांत उत्पादन विकण्यास पात्र होते. 

उस्मानाबादी शेळीला भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात चेन्नई येथील "जीआय'च्या कार्यालयात नोंदणीसाठीचा अर्जही सादर करण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यांत मानांकन मिळेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. एन. बी. आघाव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद. 
उस्मानाबादी शेळी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरिबांची गाय म्हणून ती समजली जाते. या शेळीला "जीआय' मानांकन मिळावे, यासाठीचा अहवाल तयार करण्यात आला असून, दोन डिसेंबरला संबंधित विभागाकडे अर्जही दाखल करण्यात आला आहे. "जीआय' मानांकन मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. 
- प्रो. गणेश हिंगमिरे, जीआय- स्वामित्व हक्क तज्ज्ञ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com