पालकमंत्रिपदाची धुरा दीपक सावंत यांच्या खांद्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांना बाजूला सारत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. या बदलास कदम-खैरे वादाची किनार असल्याची चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांत सुरू झाली आहे.

औरंगाबाद - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांना बाजूला सारत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. या बदलास कदम-खैरे वादाची किनार असल्याची चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांत सुरू झाली आहे.

शिवसेनेने केलेल्या शिफारशीनुसार मंगळवारी (ता. १६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पालकमंत्र्यांच्या फेरबदलाकडे पाहिले जात आहे. पालकमंत्र्यांविरोधात स्थानिक आमदार, खासदार यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यामुळेच हा बदल केल्याची चर्चा आहे. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. कदम हे तीन वर्षांपासून जबाबदारी सांभाळत होते. परंतु सुरुवातीपासूनच त्यांचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी खटके उडत होते. विशेषत: त्यांच्या काळात जिल्ह्यातील गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जाते. खासदार चंद्रकांत खैरे यांचे पक्षातील विरोधक हे श्री. कदम यांचे खास म्हणून ओळखले जात असत. केंद्र सरकारकडून खासदार खैरे यांनी शहरासाठी मंजूर करून आणलेल्या समांतर जलवाहिनी योजनेला देखील श्री. कदम यांनी तीव्र विरोध दर्शवत ही योजना घातक असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वीच केला होता. यावरूनच खैरे यांच्या इच्छेवर कदम हे पाणी फिरवत असल्याचे समोर आल्याने दोघांमध्ये सर्वकाही ठीक नाही, हेच स्पष्ट झाले होते. याची शहरात चवीने जोरदार चर्चाही सुरू होती. दरम्यान, याबाबत श्री. कदम यांच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्याचेही पदाधिकारी सांगत होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करून आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर आता पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बदलामुळे खासदार खैरे यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा त्यांचे समर्थक करीत आहेत. 

जिल्ह्यातील अनेक योजनांचे उद्‌घाटन झालेले असताना काम मात्र संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी तर कामही थांबल्याचा आरोप दोन दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेले आहेत. या कामांचा नवे पालकमंत्री श्री. सावंत किती पाठपुरावा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: auangabad news deepak sawant