शिकारीच्या उद्देशाने मोरांवर विषप्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

औंढा नागनाथ (जि. परभणी) - विष टाकून मोरांची शिकार करण्याचा प्रकार टेंभूरदरा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) शिवारात बुधवारी (ता.28) उघडकीस आला. या प्रकरणी वन विभागाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार टेंभूरदरा शिवारात मोरांची संख्या सुमारे पन्नासच्या आसपास आहे. मोरांच्या शिकारीच्या उद्देशाने काही तरुण या भागात आल्याची माहिती मिळताच औंढा नागनाथचे वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, वनपाल गणेश मिसाळ, प्रज्ञा खरात, शिवरामकृष्ण चव्हाण, छत्रपती दिपके, श्री. चोपडे, नीलेश तावडे, पंजाब चव्हाण आदींनी शोधमोहीम सुरू केली. त्या वेळी शेतात मोर पडल्याचे दिसले. त्याशिवाय विषबाधेने तीन लांडोर दगावल्याचे आढळले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कादरी यांनी पंचनामा केला. ताब्यात घेतलेली एक जिवंत लांडोर जामगव्हाण येथे उपचारासाठी नेत असताना दगावली. घटनास्थळी गोविंदा रामलखण चव्हाण (रा. पिंपळदरी, ता. औंढा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती पवन अशोक भोसले, सचिन भोसले (दोघे रा. सवना, ता. सेनगाव) हे फरारी झाल्याचे कळले.
Web Title: aundha nagnath marathwada news peacock hunting poisoning