आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘उभारी’ - डॉ. पुरुषोत्तम भापकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्यःस्थिती जाणून घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बुधवारपासून (ता. चार) मराठवाडा विभागात ‘उभारी’ हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्य:स्थिती व मागण्या जाणून घेण्यात आल्या.

औरंगाबाद - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्यःस्थिती जाणून घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बुधवारपासून (ता. चार) मराठवाडा विभागात ‘उभारी’ हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्य:स्थिती व मागण्या जाणून घेण्यात आल्या.

विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या उपक्रमाबद्दल सोमवारीच (ता. दोन) मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत ‘उभारी’ या कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांची सोडवणूक करण्यास सांगितले आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, कारणे, कुटुंबाची ससेहोलपट या बाबी लक्षात घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १५ नोव्हेंबर २०१७ या एकाच दिवशी भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेत त्यांना शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल, याची माहिती घेण्यात आली होती. ही मोहीम आठही जिल्ह्यांत राबवून अहवालही तयार करण्यात आला होता. त्यानुसार समस्या आणि निष्कर्षही काढण्यात आले. मात्र, राज्य महिला आयोग व विभागीय आयुक्‍त कार्यालयातर्फे २६ व २७ मार्चला झालेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांच्या कार्यशाळेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत अधिकाऱ्यांनी माहितीच गोळा केली नसल्याची बाब पुढे आली होती. यावरून सर्वत्र टीका झाल्यानंतर प्रशासनाने पुन्हा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानुसार बुधवारी (ता. चार) संवेदनशील पद्धतीने १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद साधत माहिती संकलित करून शनिवारपर्यंत (ता. सात) सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू
शासन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असून त्या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे मत डॉ. भापकर यांनी व्यक्‍त केले. जटवाडा येथील शेख शानूर शेख डोंगर या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना डॉ. भापकर यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते. हा उपक्रम विभागीय आयुक्तांच्या पुढाकारातून तयार झाला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे पालकत्व तहसीलदार स्वीकारणार असून या कुटुंबीयांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी अपर तहसीलदार रमेश मुनलोड, सरपंच, ग्रामसेवक, गावकरी उपस्थित होते.

Web Title: auraangabad marathwada news suicide affected farmer family