दिवसाचे सोडाच; रात्रीचेही तापमान वाढले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

उष्माघात जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे अणि गर असलेली फळे खावीत. घराबाहेर पडताना काळ्या किंवा गडद रंगाचे वस्त्र टाळावेत. टोक्‍यावर पांढरी डोपी किंवा रुमाल बांधून घ्यावा. 
- डॉ. समीर एकशिंगे, वैद्यकीय सल्लागार.

औरंगाबाद - मागील आठवडाभरापासून शहराचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. रात्रीच्याही तापमानात वाढ झाली असून, उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रसदार फळे, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दरम्यान, दुपारी उन्हामध्ये घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत.

उष्माघात झाल्यास -
  सर्वप्रथम व्यक्तीला थंड ठिकाणी नेऊन अंगावरील जास्तीचे कपडे काढावेत, उष्णता कमी होईल.
  शरीर ओल्या कपड्याने पुसावे. आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.
  रुग्णाची मान, पाठ, बगल अथवा मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यावा. 
  उन्हामुळे नाकातून रक्तस्राव सुरू असेल तर नाकाच्या मांसल भागावर बर्फ फिरवावा.
  रुग्णावर पाण्याचा वर्षाव करावा तसेच मरगळ आली असेल तर श्‍वसनक्रियेची तपासणी करावी.
  शुद्धीवर आल्यावर रुग्णाला पाणी पिण्यास द्यावे.
  त्वरित डॉक्‍टरांकडे जावे.

असा घ्या आहार -
  पौष्टिक, प्रथिनेयुक्त अन्नाचे सेवन करा, गर असलेली फळे खा.
  लिंबूपाणी, पातळ ताक आणि नारळपाण्याचे सेवन करा.
  सकाळी नियमित हलका व्यायाम करा.
  तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा. गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पलचा वापर करा.
  घर थंड ठेवा, सनशेड बसवा, रात्री खिडक्‍या उघड्या ठेवा.
  शक्‍यतो थंड पाण्याने अंघोळ करा.
  बाहेर फिरताना चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा. 
  अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

हे टाळा -
  अति थंड पाणी व शीतपेय पिण्याचे टाळा. कॅफिनेटेड किंवा कार्बोनेटेड पेय, मद्यार्क पेय, चहा-कॉफी आणि साखरेचा अतिवापर टाळा.
  तळलेले पदार्थ खाऊ नका.
  काळे, गडद रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळा.
  शिळे अन्न खाणे टाळा. 
  दुपारी बारा ते तीन या वेळेत उन्हात फिरू नका. 
  पार्किंग वाहनांत मुले, पाळीव प्राण्यांना सोडू नका. 

वार/तारीख           दिवस      रात्र
  सोमवार (ता.२)    ३९.२      २४.८
  रविवार (ता.१)      ३९.२     २१.३
  शनिवार (ता. ३१)    ३९.३    २२.४
  शुक्रवार (ता.३०)    ३९.६     २२.२
  गुरुवार (ता.२९)    ३९.४      २३.४
  बुधवार (ता. २८)    ३९.०    २३.५ 

Web Title: auraangabad marathwada news tamperature increase