अपघातग्रस्त पोलिसाचे पिस्टल, काडतुसे चोरीला

अपघातग्रस्त रिक्षा.
अपघातग्रस्त रिक्षा.

औरंगाबाद - साहित्य घेऊन जाताना रिक्षाला अपघात झाल्याने पोलिस शिपाई जखमी झाला. अपघातानंतर पिस्टल व दहा काडतुसे लंपास झाल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. सहा) रात्री सव्वाअकरा ते पाऊणेबारादरम्यान घडला. पोलिसासह अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शिवानंद स्वामी (वय २७, रा. भोईवाडा, मूळ सोलापूर) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते मुख्यालयात नोकरीला असून, न्यायालयात सुरक्षारक्षक म्हणून त्यांची नेमणूक आहे. त्यासाठी त्यांना पोलिस विभागाने पिस्टलही दिलेली आहे. नोकरीसाठी ये-जा करण्यास अडचणी येत असल्याने त्यांनी हनुमाननगर येथे किरायाने खोली घेतली होती. यात खोलीत शिफ्ट होण्यासाठी ते अभिषेक राजू रुद्राक्ष (वय २९) यांच्या रिक्षातून साहित्य घेऊन जात होते. त्यानंतर चंद्रकांत शशिकांत साळवे (वय १९, रा. भोईवाडा) याला सोबत घेऊन रिक्षाने निघाले. यादरम्यान अमित यांना झोप लागली. आकाशवाणी येथे खड्ड्यामुळे रिक्षा उलटली व रिक्षात झोपलेले अमित यांच्या तोंडाला जबर जखम होऊन ते रक्तबंबाळ झाले. दरम्यान, नागरिक व पोलिसांनी धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. 

अपघातानंतर चोरी
घाटीत दाखल झाल्यानंतर स्वामी यांच्याकडे पिस्टल नव्हती. आपली पिस्टल गायब झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पिस्टलची शोधाशोध सुरू झाली. जवाहरनगर पोलिस घटनास्थळी गेले; पण पिस्टल तसेच काडतुसेही दिसून आली नाहीत. यामुळे एकच खळबळ उडाली असून, पिस्टलचा शोध घेतला जात आहे. 

ते दोघे नशेत...
घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी अभिषेक रुद्राक्ष व चंद्रकांत साळवे यांची ब्रीथ अॅनालायझर टेस्ट केली. त्यावेळी दोघांनी मद्यसेवन केल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात तसेच पिस्टल व काडतूस हरवल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

त्यांचा ब्रीथ अॅनालायझरला विरोध
अपघातग्रस्त पोलिस कर्मचारी अमित यांनी ब्रीथ अॅनालायझरला विरोध केला. त्यामुळे घटनेवेळी त्यांनी मद्य घेतले होते की नाही हे स्पष्ट झाले नाही, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांच्या सुचनेनुसार, डॉक्‍टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com