सामाजिक उपक्रमाला एक तृतीयांश पगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

अडचणींवर मात करून आज प्रत्येक जण आपल्यापरीने मदतीसाठी इच्छुक असतो. सणावाराला मुलांना एकत्र करून त्यांना जेवण, कपडे, शालेय साहित्य देणे असे उपक्रम सदस्य आपल्या सोयीच्या वेळेत राबवितात. गरीब अथवा अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दर महिन्याला संस्थेतर्फे नियोजन केले जाते. 
- देवेंद्र सोळंके, मुख्याध्यापक, महापालिका शाळा, चिकलठाणा

औरंगाबाद - तळागळातील लोकांच्या आयुष्यात शिक्षणाने सक्षमता यावी, या दृष्टिकोनातून बी. एल. जाधव यांच्या पुढाकारातून औरंगाबादेत फेब्रुवारी २०१७ मध्ये साहिल बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. या संस्थेतर्फे गरजूंसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. पुढे एक-एक सदस्य संस्थेला जोडत गेला. आजमितीला ४२ सदस्य या संस्थेस जोडले गेले. ते सर्व नोकरदार असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. प्रत्येक सदस्य पगारातील एक तृतीयांश भाग समाजिक उपक्रमास देतो. याच कार्याशी संबंधित मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी हा प्रवास उलगडला.  

तळागळातील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी कविता ब्रिजेस जाधव, साहिल जाधव, दीपक जोशी आणि ज्ञानेश्‍वर सांगळे यांनी पाठिंबा दिला. सुरवातीस संस्थेकडे पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे दहावीच्या गरीब मुलांना क्‍लासेससाठी मदत करणे, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटणे असे उपक्रम राबवले. आज प्रत्येक जण पगारातील एक तृतीयांश भाग या उपक्रमास देतो. रस्त्यांच्या कडेला राहणाऱ्या भटक्‍या लोकांना तसेच महापालिका रात्र निवारागृह येथे संस्थेने ब्लॅंकेटचे वाटप केले. अनाथालयातील मुलांना दिवाळीत कपडे, मिठाई देऊन त्यांचे पालकत्वही काही सदस्यांनी स्वीकारले.

यंदा बालदिनानिमित्त (१४ नोव्हेंबर) शाळाबाह्य मुलांसाठी चित्रकला आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्याने या उपक्रमाद्वारे आतापर्यंत चाळीस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. त्यासाठीचा खर्च संस्था उचलते. सरकारकडून कोणताही निधी संस्थेला मिळालेला नाही.

चिकलठाणा शाळेला मदत
महापालिकेच्या चिकलठाणा परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात गोरगरीब मुले शिक्षण घेतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आई-वडील कुडाकचरा जमा करून उदरनिर्वाह चालवितात. अशांच्या मुलांना दत्तक घेऊन संस्था त्यांच्या वह्या, पुस्तक, गणवेश यांच्यावर खर्च करते. 

Web Title: aurangaba news Social enterprise