औरंगाबादेत क्लोनिंग केलेल्या चेकद्वारे बँकांना 80 लाखांना गंडा

मनोज साखरे
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबादेत अशा पद्धतीने चार लाख 80 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. यात पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद - आधारकार्डवर पत्ता बदलून बँकेत खाते उघडायचे, त्यानंतर इतर कंपन्या, फर्मचे चेक व खाते क्रमांकाची माहिती मिळवायची, क्लोनिंग केलेल्या चेकद्वारे बँकेतून पैसे काढायचे. अशी मोडस वापरून कोट्यवधींची बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. औरंगाबादेत अशा पद्धतीने चार लाख 80 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. यात पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

मानिषकुमार जयराम मोर्या उर्फ राकेश (वय 23, रा. उत्तरप्रदेश), हरीश गोविंद गुंजाळ (वय 39, रा. माणगाव, ता कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), मनदिपसिंग बनारसीदाससिंग (वय 29, रा. दिनानगर, गुरुदासपूर, पंजाब), रशीद इम्तियाज खान (वय 50, नालासोपारा, पालघर मुंबई मूळ उत्तरप्रदेश), डबलु शेख अरमान शेख (वय 32, रा. पश्चिम बंगाल) अशी संशयितांची नावे आहेत. हरीश गुंजाळ याच्या नावाने औरंगाबादेत 19 खाते विविध बँकेत काढण्यात आले असून तीन बँकेतून संशयितांनी चार लाख रुपये क्लोनिंग चेकद्वारे काढले होते. गुंजाळ याला कुडाळ तर उर्वरित चौघांना मुंबईतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 27 एटीएम, 15 मोबाईल, 26 चेकबुक, रबरी शिक्के, विविध नावाचे 30 चेक, पॅनकार्ड, पैसे मोजण्याचे मशीन, संगणक सिपीयू, प्रिंटर, निवडणूक ओळखपत्र व इनोव्हा कार जप्त करण्यात आली. तसेच 1 लाख 76 हजार 920 रुपये गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केले.

एक व्यक्ती पंधरा मोबाईल अन..27 एटीएम
प्राथमिक माहितीनुसार, मानिषकुमार मास्टरमाईंड असून तो केवळ बारावी पास आहे, 15 मोबाइल व 27 एटीएम कार्ड तो स्वतः ऑपरेट करीत होता. गरजू व्यक्ती हेरून तो त्या व्यक्तीची कागदपत्रे, आधारकार्ड वापरून बँकेत खाते उघडत होता, एक खात्यासाठी 2 हजार रुपये गरजूना तो देत होता असे पोलिसांनी सांगितले.

अशी होती शक्कल
ज्या शहरात बँका, फर्म अथवा कंपनीला टार्गेट करायचे त्या शहरात खोली किरायने घेतली जात होती. भाडेकराराची कागदपत्र व पत्ता वापरून दुकान परवाना व जीएसटी क्रमांक मिळवला जात होता. नंतर बँकेत खाते उघडून चेकबुक मिळवले जात होते. बँकेतील मोठे ग्राहक शोधून त्यांचा खाते व चेकक्रमांक मिळवून त्याची क्लोनिंग केली जात व बनावट सही करून पैसे काढले जात होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Aurangabad bank fraud by check cloning