औरंगाबादकरांचे मुंबई हेलपाटे थांबणार 

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

औरंगाबाद - पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात हे कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे. 

औरंगाबाद - पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे हेलपाटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात हे कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे. 

औरंगाबादेतील पासपोर्ट कार्यालय बंद झाल्यानंतर येथील नागरिकांना कागदपत्रे आणि मुलाखतीसाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागतात; मात्र या चकरांच्या फेऱ्यातून औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालयाच्या विस्तारीकरणात औरंगाबादचा नंबर लागल्याने औरंगाबादेत हे नवे कार्यालय थाटण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या स्थापनेसाठी औरंदाबादेतील दोन जागांची पहाणी करण्यात आली होती. गारखेडा मार्गावरील रिलायन्स मॉलवरील जागा आणि त्यानंतर छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. गारखेड्यातील जागा फारशी मनात न भरल्याने विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला नापसंती दर्शविली. यानंतर छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयातील जागा ही सर्वच दृष्टीने सोयीची असल्याने त्या जागेत कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाने दिल्लीला रवानाही केला आहे. 
 

पोस्टाचेच कर्मचारी, मुंबईसारखेच कार्यालय 
औरंगाबादेतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयातील जागा ही सुरक्षा, दळणवळणाच्या दृष्टीने चांगली असल्याने या जागेला पसंती देण्यात आली. या कार्यालयाचा कारभार करण्यासाठी पोस्टाच्याच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. मुंबईतील कार्यालयाच्या पार्श्‍वभूमीवर कॉर्पोरेट लुक असलेले पासपोर्ट कार्यालय औरंगाबादेत थाटण्यात येईल. हे कार्यालय नव्या वर्षाच्या प्रारंभी सुरू होण्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी त्याला पासपोर्ट विभागीय कार्यालयाच्या वतीने अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 
 

""औरंगाबादकरांची पासपोर्ट कार्यालयासाठीची आग्रही मागणी आहे. ती पाहता येथे पायलट प्रकल्पांतर्गत नवे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येईल. पोस्टाचे मनुष्यवळ यासाठी वापरण्यात येईल, तर त्यांच्याच छावणीतील कार्यालयातून हा कारभार चालेल. औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि बीड जिल्ह्यातील लोकांना याचा फायदा होईल. त्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे रवाना करण्यात आला असून वरिष्ठही त्यासाठी सकारात्मक आहेत.'' 
-स्वाती कुलकर्णी (विभागीय पासपोर्ट अधिकारी, मुंबई) 

Web Title: Aurangabad citizen gift of the passport office

टॅग्स