शहराची प्रतिमा बदलण्याची गरज - इम्तियाज जलील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

शहराची दंगलग्रस्त शहर अशी प्रतिमा झाली आहे. हिंदू-मुस्लिम असे धगधगते वातावरण ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत गढूळ झालेले हे वातावरण बदलून पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष शहर अशी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करूयात, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्‍वास खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद - शहराची दंगलग्रस्त शहर अशी प्रतिमा झाली आहे. हिंदू-मुस्लिम असे धगधगते वातावरण ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न झाले. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत गढूळ झालेले हे वातावरण बदलून पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष शहर अशी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करूयात, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्‍वास खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. 

प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता.सात) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘औरंगाबाद जिल्ह्याचा विकास : संधी आणि समस्या’ यावर खासदार इम्तियाज जलील यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. विजय दिवाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय आवटे व डॉ. वाल्मीक सरवदे उपस्थित होते. 

यावेळी खासदार जलील म्हणाले, की आपण निवडून आल्यापासून या शहराचे आता काय होईल, अशी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी संपूर्ण जिल्ह्याचा खासदार आहे. सर्वांचा विकास हा आपला प्रयत्न आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून या शहराचा विकास रखडलेला आहे. त्याला जेवढे राजकारणी जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार येथील लोकही आहेत. येथील सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा, असे कधी लोकांना वाटले नाही. आता तुम्ही मला निवडून दिले त्यामुळे येत्या पाच वर्षांत शहर- जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले, हे विचारण्याचा अधिकार तुमचा आहे. 

निवडणूक काळात प्रत्येक नागरिकाची पाणी हीच समस्या असल्याचे लक्षात आले. माझ्याप्रमाणे संसदेत अनेक खासदारांनी याच विषयावर विशेष सत्र आयोजित करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणी वितरणासाठी समांतरचा अग्रह धरण्यात येत आहे; मात्र ही कंपनी पाण्याचा व्यवसाय करणार असल्याचे आपला त्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

अध्यक्षीय समारोप डॉ. दिवाण यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. अंभोरे यांनी केले. आभार डॉ. संजय मून यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City Development Imtiyaz Jaleel