दिवसा दिवे अन्‌ रात्रभर अंधार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

शहरात सध्या महापालिकेची यंत्रणा दिवसाच्या प्रकाशात पथदिवे लावून अंधार शोधत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रात्री बंद राहणारे पथदिवे दिवसा मात्र लखलखताना दिसत असल्याने नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

औरंगाबाद - शहरात सध्या महापालिकेची यंत्रणा दिवसाच्या प्रकाशात पथदिवे लावून अंधार शोधत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रात्री बंद राहणारे पथदिवे दिवसा मात्र लखलखताना दिसत असल्याने नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. 

गुरुवारी (ता. नऊ) चारपासूनच संपूर्ण जालना रोडवरील दिवे सुरू होते. त्याचप्रमाणे मकबरा ते मकाई गेटदरम्यान; तसेच उल्कानगरीतील रोपळेकर हॉस्पिटल ते चेतक घोडा, टिळकनगर या भागात भरदिवसा दिवे सुरू होते. तसेच मिलकॉर्नर ते बसस्टॅंड या रस्त्यावरही हीच स्थिती होती. महापालिकेचे विद्युत ठेकेदार व त्यांचे कर्मचारी रात्रीच्या वेळी दिवे सुरू करण्यासाठी वेळ लागतो म्हणून चारपासूनच विद्युत दिवे सुरू करून टाकतात. मात्र, वेळेअगोदर विद्युत दिवे सुरू केल्याने दररोज हजारो रुपयांचे विजबिल महापालिकेला भुर्दंड स्वरूपात भरावे लागत आहे. विविध भागांत आलटून पालटून विद्युत दिवे बंद ठेवण्यात येतात. अनेक ठिकाणी बंद पडलेले एलईडी दिवे बदलण्याची तसदीही महापालिका घेत नाही. नव्याने बसवलेले एलईडी दिवे बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे; मात्र त्या तुलनेत दिवे दुरुस्तीचे प्रमाण अत्यल्प आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City Street Light Darkness