औरंगाबाद शहराला मिळणार एक एमएलडी वाढीव पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

चार दिवसांत होणार काम पूर्ण 
२५ एप्रिलपासूनच टॅंकर बंद करण्याचे नियोजन होते. खोडेगाव येथे टॅंकर फिलिंग पॉइंट तयार करण्याच्या कामास उशीर लागला. तीन-चार दिवसांत काम पूर्ण होईल. त्यानंतर १ मेपासून ग्रामीण भागाचे टॅंकर फारोळा येथून खोडेगाव प्रकल्पाकडे वळविले जाणार असल्याचे श्री. कोल्हे यांनी सांगितले.

औरंगाबाद - शहरात पाण्याची आणीबाणी असताना महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रामीण भागासाठी रोज ८० टॅंकर म्हणजेच एक एमएलडी पाणी दिले जात आहे. हे पाणी बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार एक मेपासून खोडेगाव येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे टॅंकर बंद केले जातील. परिणामी, शहरासाठी एक एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी गुरुवारी (ता.२५) सांगितले. 

गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा जायकवाडी धरण मृतसाठ्यात गेले आहे. त्यामुळे महापालिकेला आपत्कालीन पंप सुरू करावे लागले असून, सध्या पाणी उपशात २० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. दुसरीकडे शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने मागणी वाढली आहे. मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक वारंवार रस्त्यावर उतरून व पाण्याच्या टाकीवर येऊन आंदोलने करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील ३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यासोबतच महापालिकेच्या योजनेवरून ग्रामीण भागासाठी दिले जाणारे पाणी बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत ८० टॅंकर पाणी दिले जाते. हे टॅंकर बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले होते. त्यानुसार खोडेगाव येथील प्रकल्प एक मेला सुरू केला जाणार असून, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिकेकडे येणार टॅंकर बंद होतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे एक एमएलडी पाणी वाचणार आहे.

Web Title: Aurangabad City Water Supply