नागरिकांचे पाणी पाणी, आयुक्त रंगले पार्टीत 

माधव इतबारे
गुरुवार, 16 मे 2019

औरंगाबाद : आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेचा पदभार घेऊन बुधवारी (ता. 15) वर्षे पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काल नगरसेविकांनी आयुक्तांच्या दालनातच तक्रारीचा पाढा वाचला. त्यामुळे सकाळी नाराज झालेल्या आयुक्तांनी रात्री मात्र वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या पार्टीत अधिकाऱ्यांनी देखील सहभागी होत आनंद लुटला. विशेष म्हणजे, एकाही पदाधिकाऱ्याला या पार्टीचे निमंत्रण नव्हते.

शहरातील विकास कामे गेल्या वर्षभरापासून ठप्प आहेत. कचऱ्याचा प्रश्‍न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. दररोज नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. शहर बस सुरू झाली असली तरी शंभर बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. बस थांब्याची दुरवस्था कायम आहे. कंत्राटदारांनी महापालिकेच्या कामांवर बहिष्कार टाकलेला असल्यामुळे वॉर्डातील छोट-मोठी कामे होत नसल्याने नगरसेवक संतप्त आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त डॉ. विनायक निपुण यांच्या कार्यभाराची काल वर्षपूर्ती झाली. नेहमीच गोड गोड बोलणाऱ्या महापौरांनी यानिमित्ताने आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर स्वपक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचा डाव उधळून लावला.

त्यानंतर प्रोटोकॉल मोडून महापौर सत्कार करण्यासाठी आयुक्तांच्या दालनात गेले मात्र महापौरांच्या पाठोपाठ दालनात आलेल्या नगरसेवक, नगरसेविकांनी आयुक्तांवर प्रश्‍नांची सरबत्ती करत रंगाचा बेरंग केला. त्यामुळे आयुक्त नाराज झाले. असे असताना रात्री मात्र वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानाच्या जलतरण तलावाच्या परिसरात त्यासाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रजनीनंतर आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी गाणे म्हणत पार्टीची शोभा वाढविली. त्यानंतर जेवणाच्या पंगती उठल्या. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. एका खास व्यक्तीमार्फत अधिकाऱ्यांना पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते. पदाधिकाऱ्यांना मात्र डावलण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad commissioner busy in party and citizens faces water issue