vidhan Sabha 2019 :औरंगाबादेत कॉंग्रेसची अवस्था "आधे इधर, आधे उधर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

उमेदवारीचा वाद सोडविण्यासाठी प्रदेश कमिटीकडे धाव

औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला आहे. महाआघाडीतील जागावाटपानुसार पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला सुटला असल्याने संभ्रम असून, यावर तोडगा काढण्यासाठी प्रदेश कमिटीला कळविण्यात आल्याचे कॉंग्रेसचे पदाधिकारी डॉ. जफर खान यांनी गुरुवारी (ता. 17) पत्रपरिषदेत सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा शहरात एकही उमेदवार उरलेला नाही. त्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व समाजवादी पार्टीची आघाडी झाली. जागावाटपात पूर्व मतदारसंघ हा समाजवादी पक्षाला सोडण्यात आल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. त्यानंतर आघाडी तुटल्याचे सांगत अपक्ष उमेदवार युसूफ मुकाती यांना पुरस्कृत करण्यात आले; मात्र त्यावर नाराजी व्यक्त करीत अनेक पदाधिकारी समाजवादी पक्षाचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्यासोबत काम करीत आहेत. यासंदर्भात जफर खान म्हणाले, याप्रकरणी प्रदेश कमिटीशी चर्चा केली असून, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे; मात्र सध्या प्रदेशाध्यक्षही निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे खान म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरजितसिंग खुंगर, मोहंमद ताहेर, मोहंमद जफर, मुस्तफा खान, अरुण गवळे, अब्दुल रहीम, अमित सिंग, तकी हसन खान, अहमद चाऊस, मोठे भाभी, शेख रफिक अहमद यांची उपस्थिती होती. 

आघाडीचे उमेदवार कुरेशीच 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस - समाजवादी पक्षाची आघाडी असून, राज्यात केवळ एका जागेवरच मैत्रीपूर्ण लढत आहे. पूर्व मतदारसंघात कलीम कुरेशी हेच आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुरजितसिंग खुंगर यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Congress status "half here, half here"