Video : औरंगाबादेतील अपंग पुरवतात मंत्रालयाला फायली : ८० लाखांची कमाई

सुशील राऊत 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आज जागतिक अपंग दिन. यानिमित्ताने औरंगाबाद शहरात दिव्यांगांना स्वावलंबी बनवणाऱ्या या संस्थेच्या कामाची ही यशोगाथा...

औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद दिल्याचे प्रशिक्षणार्थी तरूण-तरूणी सांगतात. संस्थेच्या २० वर्षात दोन हजार पेक्षा ज्यास्त अपंगाना याचा लाभा झाला. 

'आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष १९८१' या मुहूर्तावर तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या पत्नी नलिनी रंगनाथन व जिल्हाधिकारी यांच्या पत्नी चिन्मुळगुंद यांनी सहायक धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकरूण प्रेरणा ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. 

दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, यासाठी १९८३ साली तत्कालीन अध्यक्षा व विभागीय आयुक्तांच्या पत्नी सुमनताई राजवाडे यांच्यापासून आजपर्यत अनेक जण सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते कै.झुल्फीकार हुसेन, कै.निवृत्त ले.कर्नल पी. एन. मोडक, समाज सेविका कै. डॉ. सुधाताई काळदाते, कै.मोरेश्वर सावे यांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाचे योगदान केल्यामुळेच संस्था आज मूर्त स्वरुपात उभी असल्याचे संस्थेचे प्रेमराज पाटील सांगतात. 

Aurangabad News
संस्थेत काम करताना दिव्यांग व्यक्ती

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची १९८९ ला मान्यता घेऊन सी.टी.सी, टेलरिंग, वायरमन हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विनाअनुदान तत्वावर संस्था चालवते. या प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २५ असून किमान शैक्षणिक पात्रता ७ ते १२ वी उत्तीर्ण व ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत शैक्षणिक पात्रतेनुसार व लाभार्थीच्या आवडीनुसार अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. तसेच व्हील चेअर, तीन चाकी सायकल, कुबड्या साहित्य देऊन त्यांचे शारीरिक पुनर्वसन केले जाते. 

Aurangabad News
संस्थेत काम करताना दिव्यांग तरुण

अपंगांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा पातळीवर अपंगाच्या खुल्या क्रीडास्पर्धा होतात. गेल्या बारा वर्षांपासून अपंग कल्याण, पुणेतर्फे महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर दरवर्षी वेगवेगळया राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी सहभागी होतात.

अरेरे - पतंग काढताना मुलाचा मृत्यू

शहराच्या मध्यभागी १५ हजार चौरस फूट जागेत दिव्यांगांसाठी वसतीगृह सुरू करण्याकरीता हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्याकडून २००२ व २००७ अशा दोन जवळपास ३० लाख रुपये इमारत बांधकामासाठी खर्च करुन सर्व सुविधायुक्त वसतिगृह, वर्गखोल्या, कार्यालय बांधून देण्यात आले. या देणगीमुळे याचा लाभ मराठवाडा व मराठवाड्याबाहेरील सर्व दिव्यांगांना होत आहे. 

या कार्यालयात होतो पुरवठा 

प्रेरणा संस्थेत तयार केलेल्या फाईल पॅड, फाईल कव्हर्स, बॉक्‍स फाईल, पाकिटे, बाईंडींग, खुर्ची केनिंग, स्क्रीन प्रिंटींग, जॉबवर्क तयार करून अपंगाना रोजगार दिला जातो. त्यातून त्यांचे आर्थिक पुर्नवसन होण्यास मदत होते. तयार केलेल्या फाईल मंत्रालय, हायकोर्ट, डेंटल कॉलेज, औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, आदिवासी जात पडताळणी, रायगड येथील सामाजिक वनीकरण, तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषद या कार्यालयांत पुरवल्या जातात. 

Image may contain: 1 person, close-up
वसीम बेग मिर्झा

गेल्या वर्षभरापासून संस्थेशी मी जोडला गेलो आहे. प्रेरणा संस्थेच्या प्रशिक्षणामुळे मला जुन्या खुर्च्या विणण्याची कला शिकायला मिळाली. यामुळे मला महिन्याला आठ ते दहा हजार रूपये मिळतात. तर मी स्वतःच काम घेऊन उदरनिर्वाह भागवतो. 
- वसीम बेग मिर्झा, प्रशिक्षणार्थी. 

Image may contain: 1 person, outdoor and close-up
अश्‍विनी सुरासे

अपंग असल्यमुळे इतर ठिकाणी काम करतांना थोड्या अडचणी येतात. परंतु प्रेरणा संस्थेत सर्व सारखेच असल्याने कमाई करण्यासाठी उत्साह येतो. प्रेरणा संस्था मुलींनाही कौशल्यविकास प्रशिक्षण देत असल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत मिळत आहे. 
- अश्‍विनी सुरासे, प्रशिक्षणार्थी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Disabled Youth Supplying Files to Maharashtra Mantralaya