जिल्हाधिकारी मिळाले; पण महापालिका वाऱ्यावरच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - सनदी अधिकाऱ्यांच्या बदली सत्रात औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय अडचणीचे कारण पुढे करीत त्यांची बदली स्थगित करण्यात आली. बुधवारी (ता.१८)  सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांना त्वरित पदभार स्वीकारण्याचे प्रधान सचिव महेश झगडे यांनी आदेश दिले आहेत.

बदल्यांना २४ तास उलटत नाही तोच औरंगाबादचे नवनियुक्‍त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना रुजू न होता ठाण्यातच कार्यरत राहण्याचे आदेश मंगळवारी (ता.१७) देण्यात आले. दरम्यान, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना श्री. चव्हाण हे जिल्ह्यातील एका मंत्र्याचे स्वीय सहायक होते. त्यामुळे विद्यमान सरकारमधील एका वजनदार नेत्याने चव्हाण यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने त्यांची बदली तातडीने थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

येथील तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. राम यांनी तातडीने नवीन ठिकाणी रुजू होणे पसंत केले. त्यामुळे येथील कार्यभार अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे देण्यात आला. मात्र, श्री. सोरमारे यांच्यावर विविध आरोप असल्यामुळे तत्काळ त्यांच्याकडील हा कार्यभार काढावा, अशा मागणीने जोर धरला होता. त्यामुळेच नवनियुक्‍त जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांना त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

श्री. चौधरी यांचा परिचय
श्री. चौधरी हे यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून ७ जून २०१६ पासून कार्यरत होते. ते मूळचे जळगाव येथील असून, त्यांची प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीपासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरू झाली. वर्धा, ठाणे येथेही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. श्री. चौधरी यांनी बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून, वर्ष २०१० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये झाली.

Web Title: Aurangabad District Collectorate Uday Chaudhary