मेअखेर सुरू होणार मिनी घाटी पूर्ण क्षमतेने 

औरंगाबाद ः चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव रुग्णांशी संवाद साधताना. यावेळी डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. सुंदर लाळे, डॉ. अर्चना भोसले व अधिकारी.
औरंगाबाद ः चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव रुग्णांशी संवाद साधताना. यावेळी डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. सुंदर लाळे, डॉ. अर्चना भोसले व अधिकारी.

औरंगाबाद - चिकलठाणा येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेतील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) मेअखेर पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. 24) स्पष्ट केले. त्यांनी तासभर केलेल्या पाहणीत रुग्णांशी संवाद साधत प्रसूती, एनबीएसयू, ओपीडी, औषधी व रुग्णालयातील होणाऱ्या चाचण्यांचा आढावा घेतला. दरम्यान, मनुष्यबळाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

 
यावेळी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहायक संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, डॉ. सुनीला लाळे, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. भारती नागरे, डॉ. पी. एम. कुलकर्णी, डॉ. संतोष नाईकवाडे, निरंजन केळापुरे, प्रशासकीय अधिकारी जयेंद्र शिंदे, डॉ. महेश लड्डा, गुणवंत भारुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  
प्रारूप आराखडा मंजूर 
दूध डेअरीच्या जागेवर 200 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी तळमजल्यासह तीन मजल्यांच्या (जी प्लस थ्री) इमारतीच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाली; मात्र घाटीत असलेली मदर ऍण्ड चाईल्ड हेल्थ (एमसीएच) विंगही दूध डेअरीच्या जागेवर करण्याचा विषय निघाल्याने प्रस्ताव बजेटला पाठवण्यासाठी थांबला आहे. शिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही याच परिसरात नियोजन केली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 
 

लवकरच निर्णय 
घाटीत गर्दी करण्याऐवजी दूध डेअरी परिसरात एमसीएच विंगला जागा उपलब्ध असल्यास जागेची पाहणी करून निर्णय घेऊ. येत्या पाच महिन्यांत दोनशे खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यासाठी आवश्‍यक निधी, यंत्रसामग्री, औषधींची व्यवस्था तोपर्यंत केली जाईल. मनुष्यबळाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
   
डायलिसीस व कॅथलॅब सेंटर 
औरंगाबादेत दहा हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध झाल्यास 10 ते 20 युनिटच्या मोफत डायलिसीस सेंटरसाठी प्रयत्न केले जातील; तर कॅथलॅबच्या अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीच्या प्रक्रियेचे केंद्रही मराठवाड्यात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जालना व परभणीत प्रस्ताव विचाराधीन आहे. 
 
राज्यात ई-हॉस्पिटल प्रोजेक्‍ट 
लोकांना चांगल्या आणि अत्याधुनिक प्रकारच्या आरोग्य सेवा कशा मिळतील, त्या सुविधा कशाप्रकारे वाढविता येतील यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत ई-हॉस्पिटल प्रणाली अवलंबण्यात येणार आहे. त्यात नोंदणी, रुग्णाची इत्थंभूत माहिती मिळू शकेल. भविष्यात ऑनलाइन नोंदणीही शक्‍य असल्याची माहिती अनुपकुमार यादव यांनी दिली. 
 
राज्य औषधी भांडारावर प्रश्‍नचिन्ह 
 
करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागेचा ताबाही घेण्यात आला; परंतु सध्या हाफकिनकडून औषधी खरेदी प्रक्रिया होत आहे. त्यामुळे औषधी भांडार उभारावे, की औषधी भांडाराऐवजी प्रशिक्षण केंद्र यासंदर्भात निर्णय लवकरच होईल, असे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले. 
 
मराठवाड्याचा आढावा 
 
महसूल प्रबोधिनी येथे यादव यांच्या उपस्थितीत औरंगाबाद, लातूर आरोग्य परिमंडळातील आठही जिल्ह्यांचा तालुकानिहाय गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. तसेच जानेवारीअखेर लसीकरण मोहिमेतील लक्ष्य गाठण्याच्या सूचना आयुक्त यादव यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या एन-आठ येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्‌घाटन केले. या केंद्रामुळे 13 प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळतील, असेही ते म्हणाले. सध्या राज्यात 1,600 केंद्र असून ही संख्या पुढील वर्षभरात साडेचार हजारपर्यंत नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 
  
एमसीएच विंग घाटी परिसरात 
एमसीएच विंग घाटीतच उभारण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, स्त्रीरोग विभागाच्या प्रभारी डॉ. सोनाली देशपांडे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव यांची भेट घेऊन या इमारतीतील घाटीसाठीची गरज स्पष्ट केली. त्यावर यादव यांनी होकार दिल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com