औरंगाबादेत तीन दिवसात डेंगीचे 13 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

डेंगीचा कहर सुरूच; 25 जण संशयित

औरंगाबाद - शहरात गेल्या दहा महिन्यांत डेंगीचे तब्बल 335 संशयित रुग्ण आढळून आले तर त्यातील 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या काही दिवसांत तब्बल सहा जणांचे बळी गेले असून, त्यानंतर महापालिकेला जाग आली व आता धूरफवारणी, ऍबेट वाटपासह जनजागृती केली जात आहे; मात्र गेल्या तीन दिवसांत 25 जण संशयित रुग्ण आढळून आले आहेत; तर 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जुन्या शहरात अद्याप डासांचे प्रमाण धोकादायक असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. 
शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून घरोघरी साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच गेल्या दोन आठवड्यांत डेंगीने कहर केला व सहा जणांचे बळी गेले. त्यानंतर आरोग्य विभागाने हायरिस्क भागात जनजागृतीचे काम सुरू केले आहे. डेंगीकडे दुर्लक्ष करणारे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीही टीका होताच बैठक घेतली. गुरुवारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, की सप्टेंबर महिन्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 25 होती, तर गेल्या तीन दिवसांत 13 रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आले. 25 जण संशयित आहेत. महापालिकेने गुरुवारी बारूदगर नाला, मछलीखडक या भागांत डासांची घनता तपासली. यात हाउस इंटेक्‍स हा 12 टक्के एवढा धोकादायक आढळून आला. 

दत्तक अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या 
आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने आता नऊ प्रभागांत नऊ दत्तक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या आधिपत्याखाली घराघरांत तपासणी, डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे, ऍबेट वाटप, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 
------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad has 13 dengue patients in three days