नष्ट न होणाऱ्या कचऱ्याची डोकेदुखी 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नष्ट न होणारा कचरा गाडताना जमीन आणि भूजलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागेल. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासंदर्भातील अहवाल अंतीम टप्प्यात आहे. प्रत्येक ठिकाणी असे लॅण्डफिलींग करण्यासाठी किमान 3 ते 4 कोटी रुपये लागणार आहेत. एकदा लॅण्डफिलींग केल्यानंतर पाच सहा वर्षापर्यंत तिथे लॅण्डफिलींग करता येईल

औरंगाबाद - शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरही नष्ट न होणाऱ्या कचऱ्याचे लॅण्ड फिलींग करण्यात येणार आहे. म्हणजे जमिनीत तो गाडण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर किमान पाच एकर जागा लागणार असून तो भरल्यानंतर पुन्हा पाच सहा वर्षानंतर कचरा गाडण्यासाठी नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार असल्याचे बुधवारी (ता.चार) स्पष्ट झाले. 

शहरातुन दररोज किमान तीन ते साडेतीनशे टन कचरा उचलला जातो. या संकलीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यात येणार असून सध्या चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या ठिकाणी खत तयार करण्यात येत आहे तर कांचनवाडी येथील केंद्रावर गॅस आणि वीजनिर्मितीचे नियोजन आहे.

क्लिक करा ; शेतकरी महिलेने फुलविला कलकत्ता पानमळा 

प्रस्तावीत सर्वच म्हणजे चारही प्रक्रिया केंद्र पुर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतरही संकलीत करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरही 10 ते 15 टक्‍के कचऱ्याचे विघटन होणार नाही आणि त्यावर कोणत्याही प्रक्रियेचा परिणाम होणार नाही. यामुळे अशा नष्ट न होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक केंद्राजवळ हा कचरा गाडण्यात येणार आहे. तांत्रिक भाषेत लॅण्ड फिलींग केली जाईल. लॅण्डफिलींग करणे आवश्‍यक जरी असलो तरी हा प्रकल्प राबवताना महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे बुधवारी (ता.चार) महापौरांनी घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. 

लॅण्ड फिलींगला पर्याय नाही 

नष्ट न होणारा कचरा गाडताना जमीन आणि भूजलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागेल. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासंदर्भातील अहवाल अंतीम टप्प्यात आहे. प्रत्येक ठिकाणी असे लॅण्डफिलींग करण्यासाठी किमान 3 ते 4 कोटी रुपये लागणार आहेत. एकदा लॅण्डफिलींग केल्यानंतर पाच सहा वर्षापर्यंत तिथे लॅण्डफिलींग करता येईल. खड्डा भरल्यानंतर पुन्हा नव्याने दुसरीकडे जागा शोधावी लागणार आहे. एका प्रक्रिया केंद्राजवळ यासाठी पाच एकर जागा लागणार असून अशा जागा चारही प्रक्रिया केंद्राजवळ ठेवाव्या लागणार आहेत. पीएमसीच्या प्रतिनिधींनी याला दुजोरा देत लॅण्डफिलींग करणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा ; सीसीटीव्ही बंद ठेऊन फिटनेस तपासणी , आरटीओची प्रक्रियाच संशयास्पद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad Headache for no waste