"वारसा बचाव'चा मंत्र घेऊन धावले शहरवासी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - ऐतिहासिक वारशाबाबात जागृती व्हावी, त्यांचा सर्वत्र प्रसार होण्यासाठी औरंगाबाद ब्लॅक बक्‍सच्या वतीने आयोजित एमआयटी औरंगाबाद हेरिटेज अर्धमॅरेथॉन स्पर्धेत रविवारी (ता. 28) अठराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ऐतिहासिक वारसा बचावचा मंत्र घेत शहरवासीयांनी ही दौड पूर्ण केली. 

औरंगाबाद - ऐतिहासिक वारशाबाबात जागृती व्हावी, त्यांचा सर्वत्र प्रसार होण्यासाठी औरंगाबाद ब्लॅक बक्‍सच्या वतीने आयोजित एमआयटी औरंगाबाद हेरिटेज अर्धमॅरेथॉन स्पर्धेत रविवारी (ता. 28) अठराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ऐतिहासिक वारसा बचावचा मंत्र घेत शहरवासीयांनी ही दौड पूर्ण केली. 

दौलताबाद-वेरूळ लेणी-दौलताबाद यादरम्यान आयोजित एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी (ता. 28) 1800 जणांनी सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. 25, 21 आणि 10 किलोमीटर या गटांमध्ये आयोजित या स्पर्धेत शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण, महिला आणि वृद्धांनीही उत्साहात सहभाग नोंदवला. सकाळी सहाला सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी पहाटे साडेचारपासून स्पर्धकांची देवगिरी किल्ल्याच्या बाहेरील वेशीलगत जमवाजमव सुरू झाली होती. सकाळी सहाला 25 किलोमीटर गटातील पहिल्या शर्यतीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, मुकुंद भोगले, मुनीष शर्मा, डॉ. उन्मेष टाकळकर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे डॉ. शिवकांत बाजपाई आदींची उपस्थिती होती. सकाळी सहाला 25 किलोमीटर लांबीच्या शर्यतीत सहभागी स्पर्धकांना रवाना केल्यानंतर पंधरा मिनिटांच्या अंतराने 21 आणि 10 किलोमीटरच्या शर्यतींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 10 किलोमीटरच्या गटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित पोलिस आयुक्त अमितेशकुमारही या शर्यतीत सहपरिवार धावले. 

कोणी धावले... कोणी चालले... 
दौलताबाद ते वेरूळ लेणी आणि परत या मार्गावर प्रथमच झालेल्या या एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत 10 किलोमीटर गटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या मार्गावर अनेक ठिकाणी घाट, उतार तर अनेक ठिकाणी चढ होता. या मार्गावरील विविधतेचा प्रत्यय प्रत्येक गटातील स्पर्धकाला आला. धावणाऱ्या अनेकांना या रस्त्यांवर आपला वेग कमी करावा लागला, तर काहींनी पायी आणि अनवाणी चालणेच पसंत केले. 

76 वर्षीय भारस्वाडकर धावले दहा किलोमीटर 
एमआयटी औरंगाबाद हेरिटेज अर्धमॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वृद्ध व्यक्तीही पुढे आल्या होत्या. दहा किलोमीटर धावण्याच्या गटात अनेकांनी सहभाग नोदवला होता. यात 76 वर्षे वय असलेल्या शंकरराव भारस्वाडकर यांनीही दहा किलोमीटरची दौड मारली. यादरम्यान त्यांनी अनवाणी पळणेच पसंत केले. 

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे 
25 किलोमीटर ः पुरुष गट ः फेलिक्‍स रॉप (प्रथम), के. मूर्ती (द्वितीय), सुनील (तृतीय). महिला ः ज्योती गवाते (प्रथम), विरजिना जेरी (द्वितीय), मोनिका मेहता (तृतीय). डिफेन्स/पोलिस गट ः मनदीपसिंग (प्रथम), रवींद्र समद (द्वितीय), इंद्रजित यादव (तृतीय). 21 किलोमीटर ः पुरुष ः बिंद्रा कुमार (प्रथम), श्राजेश पटेल (द्वितीय), संजय कायरा (तृतीय). महिला ः वैशाली तुपे (प्रथम), माधुरी पाटील (द्वितीय), छाया गावंडे (तृतीय). 10 किलोमीटर ः पुरुष ः रमेश राथवे (प्रथम), सूरज साबळे (द्वितीय), उमेश भंडारकर (तृतीय). महिला ः नंदिनी पवार (प्रथम), सविता तांबे (द्वितीय), हेलेना अजीज (तृतीय). 25 आणि 21 किलोमीटर गटातील विजेत्यांना अनुक्रमे 15 हजार, 10 हजार आणि सात हजार रुपये, पदक आणि प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले. 10 किलोमीटर गटात ही रक्कम अनुक्रमे सात हजार, पाच हजार आणि तीन हजार अशी होती.

Web Title: Aurangabad Heritage Half Marathon