औरंगाबादचे राष्ट्रीय हॉकी खेळाडू रोहन, रोहित वडमारेंचा पाण्यात बुडून मृत्यू

rohan rohit wadmare.jpg
rohan rohit wadmare.jpg

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील टाकळगाव (का.) येथे दोघा सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.१९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. रोहन राम वडमारे (वय १८) व रोहित राम वडमारे (वय १६, रा. रामनगर, औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
अहमदपूर तालूक्यातील सर्वच धरणात पाणीसाठा भरपूर झाला आहे. रोहन आणि रोहित त्यांच्या आजोळी टाकळगाव (का.) येथे आले होते. सोमवारी दोघे दुपारी दोनच्या सुमारास आजोबासोबत जनावरे घेऊन शेताकडे गेले. शेताच्या बाजूला असलेल्या तलावात उतरले; परंतु पुढे जाताना तलावातील खदानीचा अंदाज नसल्याने ते खोलवर बुडाले. दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 

कोळी व भोई युवकांची शोधकार्यात मदत 
रोहन आणि रोहित हे दोघेही तलावाजवळ ठेवलेल्या कपड्यांमुळे तलावातील पाण्यात बुडाल्याचा अंदाज आला. शोधाशोध चालू झाली. सोमवारी दुपारी तीन वाजता रोहनचा तर मंगळवारी दुपारी एक वाजता रोहितचा मृतदेह सापडला. या शोधमोहिमेत अग्निशमन दलाचे माधव पानपट्टे, प्रकाश जाधव, अजित लाळे, कैलास सोनकांबळे यांच्यासह जढाळा येथील कोळी व भोई युवकांनी सहकार्य केले. 


दोघेही होते हॉकी खेळाडू 
राष्ट्रीय पातळीवर हॉकी खेळलेल्या प्रियंका आणि प्रीती वडमारेंचे रोहन व रोहित वडमारे हे भाऊ होते. तेही हॉकी खेळाडू होते. रोहन राज्य व राष्ट्रीय पातळीवर हॉकी खेळला होता. रोहितही राज्यपातळीवर हॉकी खेळला होता. या सर्व भावंडांनी ज्ञानदीप विद्यालयाकडून हॉकी खेळली आहे. रोहन मागील वर्षी विद्यापीठाकडून खेळला तर रोहित यावर्षी १० वी पास झाला होता, अशी माहिती हॉकीचे प्रशिक्षक श्‍यामसुंदर भालेराव यांनी दिली. दोन्हीही खेळाडूंच्या अचानक मृत्यूमुळे सर्व खेळाडूंनी व जिल्हा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com