मुलांदेखत पत्नीचा घोटला गळा, पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

आजारी मुलाला पत्नी माहेरी घेऊन गेल्याने दोन मुलांदेखत पत्नीचा दोरीने गळा घोटणाऱ्या, तसेच विरोध करणाऱ्या स्वत:च्या आईच्या हनुवटीला चावणाऱ्या आरोपीला  जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद - आजारी मुलाला पत्नी माहेरी घेऊन गेल्याने दोन मुलांदेखत पत्नीचा दोरीने गळा घोटणाऱ्या, तसेच विरोध करणाऱ्या स्वत:च्या आईच्या हनुवटीला चावणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सक्तमजुरीसह जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (ता. 7) ठोठावली. विलास घोडके (एकतुनी, ता. पैठण) असे आरोपी पतीचे नाव आहे. तक्रार मृत सुनेच्या सासूने म्हणजेच आरोपीच्या आईने दिली, तर आरोपीच्या पाचवर्षीय मुलीची साक्षही महत्त्वपूर्ण ठरली. 

मृत विवाहिता रेणुका घोडके व आरोपी विलास यांना पाच वर्षांची मुलगी, तर तीन वर्षांचा मुलगा आहे. जानेवारी 2015 मध्ये विलास, रेणुका व दोन्ही अपत्यासह सैलानी (जि. बुलडाणा) येथे राहायला गेले होते. दरम्यानच्या काळात मुलगा आजारी पडल्याने रेणुका मुलाला घेऊन माहेरी गेली होती व घटनेच्या आठ दिवसांपूर्वी रेणुका सासरी आली होती. सासरी आल्यानंतर तिने मुलगा आजारी असताना विलासने मारहाण केली असे सासूला (फिर्यादी सुभद्राबाई) सांगितले होते. 26 मार्च 2015 रोजी मध्यरात्री विलास घरात घुसला. दुसऱ्याच क्षणी त्याने सोबत आणलेल्या दोरीने रेणुकाचा गळा आवळू लागला असता, सुभद्राबाईने त्याला कडाडून विरोध केला. त्यावेळी विलासने सुभद्राबाईच्या हनुवटीचा चावा घेतला. त्यानंतर मदत मागण्यासाठी सुभद्राबाई सरपंचाकडे धावल्या. तेवढ्यात विलासने रेणुकाचा गळा घोटत खून केला. काही वेळात सुभद्राबाई आपल्यासोबत सरपंचाचा मुलाला घेऊन आल्या असता, रेणुका निपचित पडली होती, तर विलास पळून गेला होता. सुभद्राबाईंच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात सुभद्राबाई, सरपंचाचा मुलगा प्रवीण भानुसे, सैलानी येथे रेणुकाला मारहाण केल्याचा साक्षीदार असलेला दामोदर शिंदे, विजय देशमुख यांच्यासह विलासची पाच वर्षांची मुलगी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने अजन्म सक्तमजुरीसह जन्मठेप व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, तर दुसऱ्या कलमान्वये सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. 

Web Title: Aurangabad : Husband gets life imprisonment for killing wife