Vidhansabha 2019 : औरंगाबादमध्ये सात मतदारसंघांसाठी शिवसेनेकडून 35 इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

मुंबईत शिवसेना भवनवर मुलाखती; कन्नड, 'मध्य'मध्ये सर्वाधिक चुरस 

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी मुंबईत शिवसेना भवनमध्ये रविवारी (ता.15) मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तब्बल 35 इच्छुकांनी हजेरी लावत उमेदवारीची मागणी केली. कन्नड व मध्य मतदारसंघांसाठी सर्वाधिक चुरस आहे. कन्नड मतदारसंघातून आठ जणांनी तर "मध्य' मधून सहा जणांनी मुलाखती दिल्या. भाजपकडे असलेल्या पूर्व व फुलंब्री मतदारसंघांसाठीदेखील शिवसेनेने मुलाखती घेतल्या आहेत. पैठण व सिल्लोड मतदारसंघांसाठी मात्र मुलाखती झाल्या नाहीत. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्‍यता असल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. रविवारी शिवसेनेने मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील नऊपैकी सात मतदारसंघांसाठी तब्बल 35 जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलाखती देणाऱ्यांमध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक चुरस कन्नड व मध्य मतदारसंघांसाठी आहे. कन्नड मतदारसंघातून आठ जणांनी तर "मध्य'मधून सहा जणांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले. सिल्लोड व पैठण मतदारसंघांसाठी चुरस नाही. कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पैठणमध्ये विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांचे एकमेव नाव असल्याचे सांगितले जाते. विद्यमान आमदारांना मुलाखतीसाठी सूट देण्यात आली असल्याने पश्‍चिम मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय शिरसाटदेखील मुलाखतीसाठी गेले नाहीत. 
   
भाजपकडे असलेल्या मतदारसंघांसाठी चढाओढ 
जिल्ह्यातील नऊपैकी फुलंब्री व पूर्व मतदारसंघ भाजपकडे आहेत. युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू असून, युती निश्‍चित असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. असे असले तरी शिवसेनेने फुलंब्री व पूर्व मतदारसंघांसाठी मुलाखती घेऊन भाजपला धडकी भरविली आहे. 
 
कॉंग्रेसच्या कोल्हेंनी दिली मुलाखत 
कन्नडचे कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी थेट शिवसेना भवन गाठत मुलाखत दिली. त्यांनी अद्याप शिवसेनेत प्रवेश केलेला नाही; मात्र शिवसेनेकडून तिकिटासाठी ते इच्छुक आहेत. 
 
यांनी दिल्या मुलाखती 

  • औरंगाबाद पूर्व : राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, सुहास दाशरथे, विश्‍वनाथ स्वामी, बाळासाहेब सानप. 
  • औरंगाबाद मध्य : प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, जयवंत ओक, सुहास दाशरथे 
  • औरंगाबाद पश्‍चिम : मनोज गांगवे, बन्सीधर गांगवे. 
  • फुलंब्री ः रमेश पवार, अशोक शिंदे, नाना पळसकर, बाबासाहेब डांगे, बाळासाहेब सानप. 
  • वैजापूर : रमेश बोरनारे, प्रकाश चव्हाण, आसाराम रोठे, डॉ. डोंगरे. 
  • गंगापूर : अण्णासाहेब माने, कृष्णा पाटील डोणगावकर, ऍड. देवयानी डोणगावकर, संतोष माने, दिनेश मुथा 
  • कन्नड : उदयसिंग राजपूत, केतन काझे, संतोष कोल्हे, डॉ. अण्णा शिंदे, अवचितनाना वळवळे, दिलीप मुठ्ठे, संजय मोटे, सदाशिव पाटील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad interested candidates interviews