एसटी गेली डब्यात, ट्रॅव्हल्स झाल्या बंद : जळगावला जाण्यासाठी 15 लिटर जास्त डिझेल

सुशील राऊत 
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

जगभरात या रस्त्याच्या कामाची बदनामी झाल्यामुळे पर्यटकांनी अजिंठ्यावर बहिष्कार टाकल्याचे "सकाळ'ने सप्रमाण उजेडात आणले होते. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक, टॅक्‍सी, ट्रॅव्हल्स व्यवसाय ठप्प झाला, तर रस्त्यालगतच्या पिकांचे धुळीमुळे नुकसान होत आहे.

औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाचा एसटी, ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना फटका बसत आहे. जळगाव रस्त्याशी जोडलेल्या इतर व्यवसायांवरही याचा परिणाम झाला आहे. एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्स बसेसना या ट्रिपसाठी तब्बल 15 लिटर डिझेल जास्त जाळावे लागत असल्याची तक्रार व्यावसायिक करीत आहेत.

Image may contain: one or more people, motorcycle and outdoor
औरंगाबाद - जळगाव रस्त्याची सद्यस्थिती

जगभरात या रस्त्याच्या कामाची बदनामी झाल्यामुळे पर्यटकांनी अजिंठ्यावर बहिष्कार टाकल्याचे "सकाळ'ने सप्रमाण उजेडात आणले होते. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक, टॅक्‍सी, ट्रॅव्हल्स व्यवसाय ठप्प झाला, तर रस्त्यालगतच्या पिकांचे धुळीमुळे नुकसान होत आहे. शेती, प्रवासी, पर्यटक, वाहनचालक, खासगी वाहनचालक व हॉटेल व्यवसायावर 50-60 टक्के फरक पडला असल्याचे व्यावसायिक सांगतात. या रस्त्यावर रोज प्रवास करणाऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

का लागते जास्तीचे डिझेल? 

जळगाव रस्ता चौपदरीकरणाच्या कामासाठी इथून तिथपर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. मोठमोठाले खड्डे पार करण्यासाठी वाहने पहिल्या, दुसऱ्या गिअरवरच चालवावी लागतात. त्यामुळे वाहनांना जास्तीचे पेट्रोल, डिझेल लागते. औरंगाबादहून जळगावला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सला तब्बल 15 लिटर जास्तीचे डिझेल लागत असल्याचे ट्रॅव्हल्सचालक सांगतात. आजची डिझेलची किमत 70 रुपये 30 पैसे एवढी आहे. त्यानुसार एका बाजूच्या प्रवासासाठी 1,054 रुपयांचे जास्तीचे डिझेल लागते. तसेच मोठ्या वाहनांचा मेंटेनन्स खर्च तिप्पट वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. नफा-तोटा गोळाबेरीज एकच होत असल्यामुळे काही कंपन्यांनी जळगावला जाणारी ट्रॅव्हल्स सेवा बंद केल्याचे सांगितले. 

एसटी आणखीच डब्यात 

ट्रॅव्हल्सला एवढे जास्त डिझेल आणि मेंटेनन्स खर्च येत असेल, तर एसटी महामंडळाच्या जळगाव, मलकापूर, भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड या मार्गाने ये-जा करणाऱ्या महामंडळाच्या बसगाड्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एसटीच्या या मार्गावरील बसच्या उत्पन्नाला कोट्यवधींची कात्री लागत असल्याचे चालक-वाहक सांगतात. शिवाय खड्ड्यांमुळे मानेचा-पाठीचा त्रासही सुरू झाल्यामुळे टॅक्‍सीचालकदेखील अजिंठ्याला प्रवासी घेऊन जाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे या मार्गावरील हॉटेल व्यवसायही धोक्‍यात आला आहे. 

Ajanta Road
धुळीने झाकलेले शेतातील कपाशीचे झाड

धुळीमुळे पिकांचा खराबा 

जळगाव रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही रस्त्यावरची धूळ दुतर्फा शेतातील पिकांवर बसत आहे. रस्त्यालगतच्या फुलंब्री, सिल्लोड तालुक्‍यातल्या कित्येक गावांतील शेतांतून कपाशी, मका आणि सर्वच पिकांवर धुळीचे थर साचले आहेत. प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत अडथळे आल्यामुळे पिकांची वाढ कमी होते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याचे फुलंब्री येथील शेतकरी कचरू जाधव यांनी सांगितले. 

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

पूर्वी शंभर टॅक्‍सी, आता दहासुद्धा नाहीत 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक जगभरातून येतात; परंतु रस्ता खराब असल्याने टॅक्‍सीचालक या रस्त्याने जाण्यास अनुत्सुक असतात. अनेक चारचाक्‍यांचे ग्राउंड क्‍लीअरन्स कमी असल्याने गाड्यांचा तळ जमिनीला घासला जातो. मोठा फटका बसत असल्यामुळे छोट्या टॅक्‍सीचालकांनी जळगाव रोडवर जणू बहिष्कारच टाकला आहे. प्रवासी जास्तीचे भाडे देणार असल्यास त्याला इतर मार्गाने अजिंठ्याला पोचवले जाते, असे मराठवाडा टॅक्‍सी असोसिएशनचे अध्यक्ष अस्लम खान यांनी सांगितले.

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

हॉटेलचे पॅकेज विस्कटले 

हॉटेल व्यवसायाला याचा मोठा फटका बसत आहे. या मार्गाने पर्यटकांची संख्याच रोडावल्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. मालक, कूक आणि वेटर्सना दिवसभर बसून राहावे लागत आहे. ऑनलाइन ऑर्डर्सही कमी झाल्या आहेत. जळगाव रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा एका ऑनलाइन हॉटेल बुकिंग कंपनीचे व्यवस्थापक अमित पारी यांनी सांगितले.

Aurangabad Jalgaon Ajanta Road
दै. सकाळच्या या वृत्ताची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Jalgaon Road Work Progress is Slow