औरंगाबाद-जळगाव रस्ता कामाला गती द्या - राजकुमार धूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

तत्काळ घेतली दखल
खासदार धूत यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ संबंधितांना फोन करून या कामांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देशित केले. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे खासदार राजकुमार धूत यांनी सांगितले.

औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच हा रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवल्याने वाहनधारक जेरीस आले आहेत. जगविख्यात अजिंठा लेणीवर पर्यटकांनी अघोषित बहिष्कारच टाकल्यामुळे गंभीर बनलेल्या याप्रकरणी लक्ष घालावे; तसेच या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य राजकुमार धूत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

‘अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार’ या ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. त्याबरोबरच खासदार राजकुमार धूत यांनीही मंगळवारी (ता.२) यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम रखडल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांबरोबरच आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनाही आरोग्याच्या समस्यांसह शेतमालाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याच रस्त्यावर जगविख्यात अजिंठा लेणी असून, तिथे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात; मात्र वर्षभरात देशी-विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यातून जगभर नकारात्मक संदेश जात असून, उद्योगांवरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

शिर्डी रस्त्याचा दर्जा वाढवून सुधारणा करा
औरंगाबाद-ए.एस. क्‍लब-लासूर स्टेशन-वैजापूरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या पर्यटक, भाविकांची संख्या मोठी आहे. दक्षिणेकडील राज्यांतून येणारे भाविक याच मार्गाने शिर्डीला जातात; मात्र या रस्त्याचीही सध्या दुरवस्था झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा वाढवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी खासदार धूत यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली.

तत्काळ घेतली दखल
खासदार धूत यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तत्काळ संबंधितांना फोन करून या कामांच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देशित केले. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे खासदार राजकुमार धूत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Jalgaon Road Work Rajkumar Dhut Nitin Gadkari