ऐनवेळी मदत मिळाल्याने झाली सुखरुप प्रसुती 

मधुकर कांबळे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जय संघर्ष ग्रुपच्यावतीने रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात रुग्णांना दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहनसेवा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शहरात ही सेवा सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातही या ग्रुपचे सदस्य कार्यरत आहेत.

औरंगाबाद-  कन्नड तालूक्‍यातील दाभाडी गावची गर्भवती महिला... तिला वेदना सुरु झाल्या ...संध्याकाळ होत आलेली. गावापासून कन्नड आठ ते नउ किलोमीटर अंतर आणि रस्ता अवघड अशा परिस्थितीत त्या अवघडलेल्या अवस्थेतील महिलेच्या मदतीला जय संघर्ष ग्रुपचे माजी जिल्हाध्यक्ष धाउन गेले. दवाखान्यात दाखल करताच अवघ्या पाच मिनीटात त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. जय संघर्ष ग्रुपची वेळीच मदत मिळाल्याने दवाखान्यात पोचू शकले, अशी भावना त्या बाळंतीणीने व तिच्या नातेवाईकांनी व्यक्‍त केली. 

जय संघर्ष ग्रुपच्यावतीने रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात रुग्णांना दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहनसेवा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शहरात ही सेवा सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातही या ग्रुपचे सदस्य कार्यरत आहेत. कन्नड तालुक्‍यातील दाभाडी गावच्या सायराबी अकबर यांची गर्भवती मुलगी मुनीराबी जमीलशाह हिला गुरुवारी (ता.28) रात्री सातच्या सुमारास पोटात दुखायला सुरुवात झाली. अवघडलेल्या अवस्थेत तिला कन्नडच्या दवाखान्यात घेउन जाणे गरजेचे होते. त्यांच्या नातेवाईकांनी ऍम्बुलन्स सेवेसाठी संपर्क केला मात्र ऍम्बुलन्स मिळाली नाही त्यामुळे त्यांनी गावात एक रिक्षा मिळविला.

हेही वाचा : महापौर म्हणाले जोडा, महावितरणने केले तोडा 

खराब रस्त्यामुळे रिक्षात त्यांना खूपच त्रास होउ लागला. तेंव्हा गर्भवतीच्या भावाच्या जय संघर्ष ग्रुपची माहिती वाचनात आली होती. त्यांनी माहिती मिळवली. त्यावरुन त्यांनी बहिरगाव येथील अजय शिरसाट यांच्याशी संपर्क केला. श्री. शिरसाट हे जय संघर्ष ग्रुपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना महिती मिळताच त्यांनी चार किलोमीटर अंतर पार करुन दाभाडी गाठले आणि तिथून त्या गर्भवतीला कन्नड येथील दवाखान्यात दाखल केले. तिला स्ट्रेचरवर टाकून मध्ये नेताच ती प्रसुत झाली आणि मुलाला जन्म दिला. 

क्‍लिक करा : निधीवरुन आधी खडाजंगी मग वाटाघाटी झाल्यावर सभा 

मिळालेली मदत मोलाची 

गर्भवती महिला मुनीराबीच्या आई सायराबी म्हणाल्या, की मुलाने ऍम्बुलन्सला फोन लावला तर फोन लागला नाही. रिक्षात बसून येत होतो पण रस्ता खूप खराब होता. ऐनवेळी बहिरगावहून अजय शिरसाट आले त्यांनी दवाखान्यात आणून सोडले. तर बाळांतीन मुनीराबी म्हणाल्या माझ्या भावाने फोन करताच ताबडतोब वाहन आले. आम्हाला वेळेवर दवाखान्यात आणुन सोडले आल्याबरोबर चार पाच मिनीटातच डिलेवरी झाली. अडचणीच्यावेळी आम्हाला खूप महत्वाची मदत मिळाली. जय संघर्ष ग्रुप खूप चांगली सेवा देत आहे. त्यांनी अशीच अडल्या नडल्या रुग्णांना दवाखान्यात सोडण्याची सेवा करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad late night free rikshwa help