बिबट्याने सौजन्य दाखवले, म्हणून निभावले! : Video/Photos

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अचानक उद्भवलेल्या या प्रसंगात काय निर्णय घ्यायचे, याबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडालेला दिसला. यातच एका बहाद्दर अधिकाऱ्याने घटनास्थळाचा दौरा करून घरी जाऊन सुट्टीचा निरोप पाठवला, त्यामुळे आणखीच गोंधळ उडाला.

औरंगाबाद : संपूर्ण आठ तासांत बिबट्या आक्रमक झाला नाही. त्याने एवढ्या गर्दीतही कुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने सौजन्य दाखवले म्हणून निभावले, असा सुस्कारा वन अधिकाऱ्यांनी सोडला असला, तरी या संपूर्ण मोहिमेत वन विभाग आणि पोलिसांचाही नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून आला. 

वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन शहरात नव्हते. उपवनसंरक्षक सतीश वडस्कर हे डेहराडून येथे होते. ते दूरध्वनीवरून संपर्कात असले, तर प्रत्यक्षात इथे अचानक उद्भवलेल्या या प्रसंगात काय निर्णय घ्यायचे, याबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडालेला दिसला. यातच एका बहाद्दर अधिकाऱ्याने घटनास्थळाचा दौरा करून घरी जाऊन सुट्टीचा निरोप पाठवला, त्यामुळे आणखीच गोंधळ उडाला.

अखेर परभणी क्षेत्राचे उपवनसंरक्षक व्ही. एन. सातपुते, विभागीय वन अधिकारी (योजना) सचिन कंद, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आर. आर. काळे यांनी समन्वय साधत मोहिमेची सूत्रे हाती घेतली. 

वन विभागाकडे असलेली डार्ट गन उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी कालच कन्नडला नेण्यात आली होती. ती तातडीने मागवण्यात आली. अकरा वाजता गन आली. तोपर्यंत परिस्थितीचा आणि बिबट्याच्या स्थानाचा अंदाज आल्यामुळे निवृत्त उपवनसंरक्षक राजेंद्र धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्याची योजना आखण्यात आली. तोवर बिबट्याने मूळ जागेवरून धूम ठोकली आणि उद्यान पार करून पडक्‍या घराचा आसरा घेतला. या सगळ्या गोंधळातच वरिष्ठांनी दम भरल्यानंतर गायब झालेले ते अधिकारी घरून पुन्हा घटनास्थळी आले. 

Aurangabad Leopard News
याच खोपटात अडकला होता बिबट्या

मोहिमेत सहायक वनसंरक्षक ए. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे, एस. आर. दहिवाल (सिल्लोड), वनविभागाचे बिबट रेस्क्‍यू टीमचे प्रसाद अष्टेकर, वन्यजीव अभ्यासक आदि गुडे यांच्यासह संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली. त्यांना प्राणिमित्र श्रीकांत वाहुळे, मनोज गायकवाड आदींनीही सहकार्य केले. 

Aurangabad Leopard News
योजना समजावून घेताना विभागीय आयुक्त

पोलिस कुठे आहेत? 

घटनास्थळावर दाखल झालेल्या विभागीय आयुक्तांनी अगोदर पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवाल केला. जमलेल्या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. सुरवातीला आलेले पोलिस अधिकारी नेमके त्या वेळी जागेवर नसल्याचे दिसताच, त्यांनी वन अधिकाऱ्यांची योजना समजावून घेत सर्वांना गोळा करून आदेश द्यायला सुरवात केली. 

Aurangabad Leopard News
नेमक्या मोक्याच्या प्रतीक्षेत बसलेले प्रसाद अष्टेकर आणि डॉ. बी. एस. नाईकवाडे

ऐनवेळी गाठली दुकाने 

बिबट्याला जागीच अडकवण्यासाठी लागणारी चेन लिंक फेन्सिंग जाळी आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी मोंढ्यातले दुकान गाठले. बिबट्याने पडक्‍या खोलीत आसरा घेतल्यावर त्याची दारे बंद करण्यासाठी पुन्हा नव्याने प्लायवुड शीट्‌स आणले. अशी तहान लागल्यावर विहीर खोदायची पाळी वन विभागावर आली. 

Rajendra Dhongade
पोलिस आणि वन अधिकाऱ्यांच्या जमावात राजेंद्र धोंगडे

सत्तरीतील निवृत्त अधिकारी फील्डवर 

वन खात्याचे अधिकारी डोक्‍याला ताप नको म्हणून ऐनवेळी सुटी टाकत असतानाच, 10 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले उपवनसंरक्षक राजेंद्र धोंगडे मात्र कंबर कसून फील्डवर आले. सकाळी सव्वा आठपासून दुपारी अडीचपर्यंत त्यांनी वन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वन खात्याच्या जवानांच्या बरोबरीने सत्तरीतील हा अधिकारी या प्रसंगात धावून आल्यामुळे वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बळ मिळाल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. 

मानव-वन्यजीव संघर्ष हाताळणारे किमान प्रत्येक जिल्ह्यात एक तरी प्रशिक्षित पथक असणे गरजेचे आहे. चांगली गन, जनावर बेशुद्ध करण्यासाठी पुरेशी औषधी, दणकट जाळे, चेनलिंक फेन्सिंग, सुरक्षिततेची इतर साधनांनी हे पथक सुसज्ज असले पाहिजे. आता तरी वन विभागाने यावर गांभीर्याने विचार करावा. 
- राजेंद्र धोंगडे, निवृत्त उपवनसंरक्षक 

पहा व्हिडिओ आणि फोडो - असा पकडला गेला बिबट्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Leopard Rescue Operation in Cidco