भाजपात खुर्च्यांची कमी नाही! - रावसाहेब दानवे

दानवे
दानवे

औरंगाबाद : देशात सरपंच ते पंतप्रधानापर्यंत भाजपाचीच लोकं आहेत. सरपंच म्हणून थेट जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे सरपंचपदावरुन चांगलीच कामगिरी करा. नाहीतर सरपंच झाले की, लगेच लागले जिल्हा परिषदेच्या तयारीला. असे न करण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला. भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागतच आहे, त्यांना खुर्च्यांची कमी नसल्याची हमी द्यायला दानवे विसरले नाहीत. 

जिल्ह्यातील भाजपाच्या 117 सरपंच आणि 754 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार दानवे यांच्याहस्ते झाला. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात रविवारी (ता. 22) दुपारी हा सोहळा रंगला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाऊराव देशमुख, महापौर भगवान घडामोडे, शहरअध्यक्ष किशनचंद तनवाणी आदींची उपस्थिती होती. 

"गमचा, फेटे, प्रमाणपत्र, फोटो असे काहीच मी सरपंच झालो त्यावेळी नव्हते. आजचे फोटो तर आम्ही घरीच पाठवणार आहोत. शेवटच्या सत्कारापर्यंत केवळ एकच ग्रामपंचायत सभागृहात शिल्लक राहते की काय? अशी भीती वाटली, म्हणूनच सत्कार थांबवून मध्येच भाषण करत आहे.'' अशी कबुली देत सुरवातीलाच दानवेंनी सरपंचाचे कान टोचले. "ग्रामसेवक हा प्राणी सरपंचाला ग्रामपंचायत काय ते समजूनच देत नसतो. त्यामुळे सरपंचानी आधी अधिकार, सरपंचकी समजून घ्यावी, त्यासाठी भाजपातर्फे आणखी एखादे प्रशिक्षण घेण्यात येईल. सरपंचाचा कारभार कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. आमदार, खासदार यांचेही प्रशिक्षण होत असते. मंत्र्यांनाही ब्रिफ केले जाते. त्यामुळे प्रशिक्षणाबाबत सरपंचांनी संकोच ठेऊ नये.'' 

"योजना खूप आहेत. तुम्हाला आमदार, खासदार यांच्या निधींचीही गरज पडणार नाही. इथून गेल्यानंतर ग्रामपंचायतींमधील वर्चस्वामुळे आपण नंबर एक असल्याचे बोर्ड गावोगावी झळकवण्याचे आदेशच दानवेंनी सरपंचांना दिले. बागडे म्हणाले, "मला कळतं ही भावना चांगली पण मलाच कळते, ही भावना असू नये. सरपंचांनी भाजपाचे नाव उंचवावे.'' 

आता श्राद्ध कुणाचे घालायचे? 
आमचेच सरपंच अधिक असल्याचे दावा करणारे पक्ष बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. असे म्हणत होते. भाजपाने आता जिल्ह्यातील 117 बाप दाखवले आहेत. आता श्राद्ध कुणाचे घालायचे असा प्रश्‍न जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी प्रस्ताविकातून नाव न घेता शिवसेनेला विचारला. तसेच दोन वरुन 24 जिल्हा परिषद सदस्य आणि 117 सरपंच असलेल्या जिल्ह्यात खासदारकीसाठी भाजपा प्रबळ असल्याचे कराड यांनी सांगत त्यांना खासदार खैरेंबाबत निवडणुक काळात फिरत असलेल्या व्हॉटस्‌ऍप मेसेजवरुनही डिवचले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com