मराठवाडा, खानदेशला आकडेमुक्त करणार - ओमप्रकाश बकोरिया

मराठवाडा, खानदेशला आकडेमुक्त करणार - ओमप्रकाश बकोरिया

औरंगाबाद - मराठवाडा आणि खानदेशामध्ये वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला आकडेमुक्त करणे हे महावितरणसमोर आव्हान आहे. ते पेलण्यासाठी महावितरण सज्ज झाले असून, आगामी काळात आकडेमुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणणार असल्याचा ठाम निर्धार महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये बकोरिया यांनी गुरुवारी (ता. २७) आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महावितरणच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मराठवाड्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार अशा अकरा जिल्ह्यांचा प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत समावेश केलेला आहे. या भागांत वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करून विजेचे उत्पन्न वाढवणे या प्रमुख उद्देशाने प्रादेशिक कार्यालयाची निर्मिती झाली आहे. महावितरणतर्फे नागरिकांना चांगली सुविधा देणे आणि त्याच्या बदल्यात वीज बिलाची वसुली करण्याचे मुख्य धोरण आहे.’’

असा आहे तोटा 
महावितरणचे तेरा जिल्ह्यांत तब्बल ३३ लाख ग्राहक आहेत. गेल्या सहा महिन्यांत ग्राहकांनी ४४१० मिलियन युनिटचा वापर केला. प्रत्यक्षात मात्र २२६९ मिलियन युनिटचे बिलिंग झाले. त्यामुळे २१४१ मिलियन युनिटची चोरी झाल्याचे स्पष्ट आहे. या वीजचोरीने महावितरणला गेल्या सहा महिन्यांत तब्बल १४ हजार १२२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

वीजगळतीचे प्रमाण लक्षात घेऊन वीजचोरांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत आठ हजार ४०९ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. त्यापैकी ३५४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले; तर उर्वरित वीजचोरांकडून जबर दंड वसूल करण्यात आल्याचे बकोरिया यांनी सांगितले. 

पाच टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन 
महावितरणने मीटर रीडिंग घेण्यासाठी खासगी एजन्सीज नेमलेल्या आहेत. या एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या निष्काळजीपणाने किंवा जाणूनबुजून केलेल्या कुचराईने महावितरणला मोठा फटका बसत असल्याचे निदर्शनास आले. खासगी कर्मचारी मीटर रीडिंग कमी दाखवतात, अनेक दिवस पैसे घेऊन हे सुरू राहते, त्यानंतर मीटरवर साचलेली रीडिंग वाढल्यानंतर मीटर फॉल्टी दाखवून महावितरणची फसवणूक करतात. हे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यासाठी तेराही जिल्ह्यांत एजन्सीने घेतलेल्या मीटर रीडिंगनंतर पाच टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन महावितरणतर्फे करण्याचे आदेश दिलेत.

मोबाईल रजिस्ट्रेशन आवश्‍यक  
वीज ग्राहकांना आता मोबाईलवर मॅसेज पाठवून माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. मीटर रीडरने घेतलेली रीडिंग, भरलेल्या बिलाची माहिती मॅसेजद्वारे ग्राहकांना पाठवली जाते. मीटर रीडरने चुकीचे रीडिंग घेतले असल्यास बिलिंग होण्यापूर्वी दुरुस्ती करून घेता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत विभागात ३३ टक्के मोबाईल क्रमांक नोंदवण्यात आले आहेत. येत्या काळात शंभर टक्के मोबाईलची नोंदणी झाल्यास तक्रारीचे प्रमाण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक नोंदवण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आधार क्रमांक नोंदवला तर शासनाच्या योजना सबसिडी व अन्य लाभ देण्यास सहजसोपे होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

महावितरणचा आक्रमक पवित्रा 

वीजचोरांच्या विरोधात थेट गुन्हे नोंदवणार
फिडरनिहाय लोड तपासून त्यानुसार वसुली करणार
डोअर टू डोअर सर्व्हे करणार

फॉल्टी मीटर तातडीने बदलून देण्याला प्राधान्य
अडीअडचणीचे निराकरण करणे 
बिल वेळेत दुरुस्त करून वसुली करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com