जिल्ह्यातील दहा कोटींची सिंचनाची कामे रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

निधी संपल्याचा फटका - झेडपीच्या बैठकीत निर्णय  

औरंगाबाद - जिल्हा परिषद सिंचन विभागाचे दायित्व वाढल्यामुळे सध्या तरी सिंचन विभागाकडे एक पैसाही राहणार नाही. सिमेंट, कोल्हापुरी बंधाऱ्यांची मंजूर झालेली, कार्यारंभ आदेश न दिलेली कामे रद्द केली तरच नवीन कामे करण्यासाठी दहा कोटींपर्यंतचा निधी सिंचन विभागाला मिळू शकतो. त्यामुळे ही कामे रद्द करावी, असा निर्णय गुरुवारी (ता.२७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व पाणीपुरवठा समितीची बैठक गुरुवारी अध्यक्षा ॲड. देवयानी कृष्णा डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी नऊ कोटी रुपये उपलब्ध असताना आठ कोटी ८१ लाख रुपये देणे आहे. म्हणजे यातून केवळ १८ लाख रुपये शिल्लक राहतात. कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांसाठी नऊ कोटी ८७ लाख रुपये देणे असताना नऊ कोटी २६ लाख रुपयेच उपलब्ध आहेत. म्हणजे ५२ लाख रुपये कमी पडतात.

हीच परिस्थिती नवीन बंधाऱ्यांच्या बाबतीत आहे. तीन कोटी उपलब्ध असताना एक कोटी ७५ लाख रुपये दायित्व आहे. गाळ काढण्यासाठी सव्वातीन कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. तो खर्च थांबविण्यात आल्याचे देवयानी डोणगावकर यांनी सांगितले. सिमेंट बंधारे व कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे ती रद्द करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. सिमेंट बंधाऱ्यांच्या दोन कोटी १७ लाखांच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला; परंतु कामे सुरू झाली नाहीत. तसेच तीन कोटी दहा लाखांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. कोल्हापुरी बंधाऱ्यांची दोन कोटी ३७ लाखांची १७ अशी कामे आणि गाळ काढण्याचे थांबविलेले तीन  कोटी दहा लाख रुपये असे दहा कोटी रुपये वाचविले तरच या वर्षात थोडीबहुत कामे घेता येतील, अन्यथा एकही काम नवीन आलेल्या सदस्यांना घेता येणार नाही. याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. 

या वेळी उपाध्यक्ष केशव तायडे, सभापती कुसुम लोहकरे, धनराज बेडवाल, मीना शेळके, रमेश पवार, गजानन राऊत, पार्वती जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, गायकवाड, घुगे आदींची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news 10 crore irrigation work cancel