‘पद्मावत’च्या पार्श्‍वभूमीवर बाराशे पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद - वादविवादानंतर अखेर ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी (ता. २५) प्रदर्शित होत आहे. दरम्यान, राजपूत करणी सेना रस्त्यावर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तगडा बंदोबस्त तैनात केला. ११ सिनेमागृहांत प्रत्येकी दोन अधिकारी आणि ५० कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. 

औरंगाबाद - वादविवादानंतर अखेर ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी (ता. २५) प्रदर्शित होत आहे. दरम्यान, राजपूत करणी सेना रस्त्यावर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तगडा बंदोबस्त तैनात केला. ११ सिनेमागृहांत प्रत्येकी दोन अधिकारी आणि ५० कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. 

बंदीनंतर पद्मावत सिनेमाला पुन्हा हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. एकीकडे या सिनेमाला सकल राजपूत समाज, करणी सेनेचा कडाडून विरोध आहे. याबाबतचे निवेदनही विविध संघटनांनी पोलिस आयुक्तांना देत शहरात चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी केली होती. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सिनेमाला विरोध करून आंदोलन करण्यात आले. तसेच जाळपोळही झाली. शहरातील अकरा चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या पार्श्‍वभूमीवर गोंधळ होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. तीन पोलिस उपायुक्‍तांसह सर्व सहायक पोलिस आयुक्‍त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक बंदोबस्तावर तैनात राहतील. तसेच सिनेमागृहात प्रत्येकी दोन अधिकारी आणि २० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

पदाधिकाऱ्यांना नोटीस
राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, क्‍यूआरटी, स्ट्रायकिंग फोर्स चोख बंदोबस्त करतील. बाराशे पोलिसही बंदोबस्तावर सज्ज आहेत. गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली. तसेच बुधवारी (ता. २४) ऑल आऊट ऑपरेशनही राबवण्यात आले.

चित्रपटगृहात प्रत्येकी पन्नासपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असून, क्‍यूआरटी पथकही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. करणी सेनेने शांतता बाळगू, असे आश्‍वासन दिले आहे. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. 
- यशस्वी यादव, पोलिस आयुक्त, औरंगाबाद शहर.

Web Title: aurangabad marathwada news 1200 police bandobast for padmavat movie