एकाच दिवशी शहरात 15 हजार वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकरांनी पदभार घेतल्यापासून लोकसहभागावर कामे करण्यावर भर दिला आहे. येत्या पाच जूनला लोकसहभागातून 15 हजार वृक्षारोपण केले जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकरांनी पदभार घेतल्यापासून लोकसहभागावर कामे करण्यावर भर दिला आहे. येत्या पाच जूनला लोकसहभागातून 15 हजार वृक्षारोपण केले जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

महापालिका आयुक्तांनी आत्तापर्यंत लोकसहभागातून शहरातील ऐतिहासिक विहिरींतील गाळ काढणे, पालिका मुख्यालयातील इमारतींची रंगरंगोटी करण्याचे काम करून घेतले आहे. आता पालिका प्रशासनाने यंदाचा पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. पाच जून रोजी पर्यावरणदिनी शहरात वृक्षलागवडीची जम्बो मोहीम राबवून एकाच दिवशी 15 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आयुक्त मुगळीकर यांनी केला आहे. या दिवशी मनपाकडून शहरातील हर्सूल तलाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या जांभूळबनात सुमारे दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील ज्या वसाहतीतून वृक्षारोपणाची मागणी करण्यात येईल, तेथे पालिकेकडून मोफत रोप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरभरात वृक्ष लागवडीसाठी विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध उपयोगी रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच या दिवशी शहरभरात स्वच्छतेची विशेष मोहीमही राबविली जाणार असून, त्यासंदर्भात नियोजन केले जात असल्याचे आयुक्त म्हणाले.

पर्यावरणदिनी सायकलचा वापर
पर्यावरणदिनी प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आयुक्तांच्या सूचनेवरून दिवसभर सायकलचा वापर करणार आहेत. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी सायकलवरूनच कार्यालयात येणार आहेत. तसेच घरी जातानाही सायकलचाच वापर करणार आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ज्यांच्याकडे सायकली नाहीत त्यांनी घरापासून पायी कार्यालयात यावे, असेही आयुक्तांचे आदेश आहेत. तसेच शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीदेखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: aurangabad marathwada news 15000 tree plantation