औरंगाबादेत 20 वर्षांत 18 वाघांचा जन्म

माधव इतबारे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद - देशभरात वाघांच्या घटत चाललेल्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात गेल्या वीस वर्षांत 18 वाघांनी जन्म घेतला आहे.

औरंगाबाद - देशभरात वाघांच्या घटत चाललेल्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात गेल्या वीस वर्षांत 18 वाघांनी जन्म घेतला आहे.

त्यातील आठ वाघ देशातील विविध ठिकाणी देण्यात आले असून, सध्या 11 वाघ प्राणिसंग्रहालयात आहेत. राज्यातील प्राणिसंग्रहालयांचा विचार करता सर्वाधिक वाघ औरंगाबादेत आहेत. मात्र, जागेअभावी गेल्या वर्षभरापासून नर-माद्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात येत आहे.

वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने देशासह जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात 2015 च्या गणनेनुसार केवळ 190 वाघ असल्याचे आढळून आले. 2018ची गणना 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात तब्बल 11 वाघ आहेत. त्यात सात पिवळ्या, तर दोन पांढऱ्या वाघांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षांत प्राणिसंग्रहालयात 18 वाघांना जन्म दिला आहे. ओरिसातील नंदनकानन उद्यानातून 1995 मध्ये महापालिकेने भानुप्रिया व प्रमोद ही पांढऱ्या वाघांची जोडी औरंगाबादला आणली होती. त्यांच्यापासून रेणुका, सिद्धार्थ, सौरभ, श्‍यामू, सीता, गीता, कैफ, सचिन, वीर असे सात वाघ जन्मले. तसेच 2005 मध्ये पंजाबमधील सतबीर प्राणीसंग्रहालयातून पिवळ्या वाघाच्या गुड्डू, दीप्ती, कमलेश, छोटू अशा दोन जोड्या आणल्या होत्या.

त्यांच्यापासून सिद्धार्थ, समृद्धी, नकुल दुर्गा व गेल्या वर्षी तीन बछड्यांचा जन्म झाला. सध्या सात पिवळे वाघ प्राणिसंग्रहालयात आहेत.

वर्षभरापासून प्रजनन बंद
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघांचे प्रजनन सध्या बंद आहे. प्राणीसंग्रहालयात सध्या असलेले प्राणी दाटीवाटीने ठेवण्यात येत असल्याचा राष्ट्रीय उद्यान प्राधिकरणाचा आक्षेप आहे. त्यामुळे वर्षभरापासून वाघांच्या नर-माद्या वेगवेगळ्या ठेवण्यात येत आहेत.

देशभरात दिल्या जोड्या
राज्यासह देशभरातील प्राणिसंग्रहालयाला वाघांच्या जोड्या देण्यात आल्या आहेत. त्यात बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयाला रेणुका-सिद्धार्थ; चंदीगड येथे सौरभ; इंदौर येथे श्‍यामू आणि गीता तर पुण्याला सचिन हा पांढरा वाघ देण्यात आला. पिवळ्या वाघांपैकी नकुल-दुर्गा ही जोडी मध्य प्रदेशमधील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयात, कमलेश-छोटू, इंदूर; तर ऋद्धी ही पुणे येथील प्राणिसंग्रहालयाला देण्यात आली.

Web Title: aurangabad marathwada news 18 tiger born in 20 years