अपुऱ्या मनुष्यबळामुळे पाडापाडी थांबली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - जयभवानीनगर परिसरात नाल्यावरील २० इमारतींवर कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या पथकाने ब्रेक घेतला आहे. नाल्यावरील अनेक अतिक्रमणे दोन-तीन मजली इमारतींचे असून, त्यात जागा अरुंद असल्याने कारवाई करताना अडचणी येत आहे. तसेच मनुष्यबळही कमी असल्याने कारवाईत व्यत्यय येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

औरंगाबाद - जयभवानीनगर परिसरात नाल्यावरील २० इमारतींवर कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या पथकाने ब्रेक घेतला आहे. नाल्यावरील अनेक अतिक्रमणे दोन-तीन मजली इमारतींचे असून, त्यात जागा अरुंद असल्याने कारवाई करताना अडचणी येत आहे. तसेच मनुष्यबळही कमी असल्याने कारवाईत व्यत्यय येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

जयभवानीनगर भागात नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने तीन दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती. पहिल्या दिवशी चार, दुसऱ्या दिवशी १४, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) केवळ दोन अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी (ता. ११) मात्र या कारवाईला ब्रेक लागला. नाल्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या इमारती दोन-तीन मजली असल्याने अशा इमारतींचा अतिक्रमित भाग पाडल्यास संपूर्ण इमारत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःहून इमारतींचा अतिक्रमित भाग पाडून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्यक्षात महापालिकेचे मनुष्यबळ कमी आहे. अरुंद जागा असल्याने जेसीबीने कारवाई करणे अशक्‍य आहे. अनेक इमारतींमध्ये नागरिक राहतात. त्यामुळे अतिक्रमण पाडताना जीवितहानी होण्याचाही धोका आहे. 

आणखी शंभर अतिक्रमणे जशास तशी 
जयभवानीनगरातील या नाल्यातून महापालिकेला भूमिगत गटार योजनेअंतर्गत मुख्य मलजल निस्सार वाहिनी टाकायची आहे. त्यासाठी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या नाल्यावर १३३ अतिक्रमणे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे; मात्र फक्त केवळ वीस अतिक्रमणे हटविल्यानंतर कारवाई मंदावल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

सोमवारी रेल्वेस्टेशनसमोर कारवाई 
रेल्वेस्टेशन समोरील वाहतुकीला अडथळा ठरणारा पेट्रोलपंप हटविण्याची मागणी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी केली आहे. पेट्रोलपंप व अतिक्रमणांवर कारवाई करीत नाही, तोपर्यंत पायात चप्पल, बूट न घालण्याचा पणही त्यांनी केला आहे. आठ दिवसांत कारवाई केली नाही तर नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचाही इशारा श्री. शिरसाट यांनी दिल्याने सोमवारी (ता.१३) पेट्रोलपंपावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news 20 building encroachment crime stop