गुणवत्ता डावलून दिलेले वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

औरंगाबाद  - जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्ताधारक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारत, कमी गुण मिळालेल्या वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती सुनील के. कोतवाल यांनी महाविद्यालयाने गुणवत्ता डावलून दिलेले वीस प्रवेश रद्द ठरवले असून, महाविद्यालयाची मान्यता, संलग्नता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खंडपीठाच्या या निर्णयाने एमबीबीएस झालेल्या वीस विद्यार्थ्यांना पदवी गमवावी लागणार आहे.

सोनपेठ (जि. परभणी) येथील तेजस्विनी राजकुमार फड या विद्यार्थिनीला वर्ष 2012 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटीमध्ये 153 गुण मिळाले होते. त्यामुळे तीचे नाव वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या यादीत आले. गुणवत्ता यादीनुसार तेजस्विनी फड यांनी जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 18 सप्टेंबर 2012 रोजी प्रवेश अर्ज सादर केला. प्रवेश समितीच्या वेळापत्रकानुसार त्या 22 सप्टेंबर 2012 रोजी प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात गेल्या, तेव्हा महाविद्यालयाचे प्रवेशद्वारच बंद होते. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तेजस्विनी फड यांनी ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेत कमी गुण असलेल्या वीस विद्यार्थ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Web Title: aurangabad marathwada news 20 student admission cancel