मानवरहित फाटकांमुळे तीस टक्के अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - 'रेल्वेचे अपघात अलीकडच्या काळात वाढले असून, ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे फाटक ही सर्वांत मोठी समस्या आहे. तब्बल तीस टक्के रेल्वे अपघात मानवरहीत रेल्वे फाटकांमुळे होत आहेत. म्हणूनच रेल्वेने सुरक्षेला अधिक महत्त्व दिले आहे,'' अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद - 'रेल्वेचे अपघात अलीकडच्या काळात वाढले असून, ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे फाटक ही सर्वांत मोठी समस्या आहे. तब्बल तीस टक्के रेल्वे अपघात मानवरहीत रेल्वे फाटकांमुळे होत आहेत. म्हणूनच रेल्वेने सुरक्षेला अधिक महत्त्व दिले आहे,'' अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबादला रेल्वे दुरुस्ती यंत्रणाचे (पिटलाइन) काम सुरू करण्यापूर्वी पिटलाइन जागेच्या पाहणीसाठी विनोदकुमार यादव यांनी चिकलठाणा रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. परभणी ते मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, लवकरच हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद शहरातून नव्याने गाड्या सोडण्यासाठीची मागणी आहे, मात्र ते रेल्वेकडे या भागात दुरुस्ती आणि स्वच्छता यंत्रणा (पिटलाइन) नसल्याने शक्‍य होत नाही, म्हणूनच पिटलाइनचे काम होत आहे, यासाठी 11 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पिटलाइन झाल्यानंतर रेल्वेगाड्या वाढवणे आणि रेल्वेगाड्यांची देखभाल करणे शक्‍य होणार आहे. नांदेड ते परभणी या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. मात्र, परभणी ते मनमाड या दुहेरीकरणाचे काम रेल्वे बोर्डावर अवलंबून आहे, त्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, येत्या अर्थसंकल्पात हे काम व्हावे यासाठी पाठपुरावा करण्याचे अश्‍वासन यादव यांनी दिले.

औरंगाबादला राजाराणी एक्‍स्प्रेस
नांदेड-मुंबई या नवीन रेल्वेगाडीची मागणी आहे. मात्र, मुंबईत गाड्या थांबवण्याची अडचण असल्याने मध्य रेल्वे परवानगी देत नाही. त्यामुळे मनमाड-मुंबई धावणारी राजाराणी एक्‍स्प्रेस औरंगाबादपर्यंत वळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news 30% accident without man railway gate