औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार, सहा जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

सैनिकाचा अपघातात मृत्यू

सैनिकाचा अपघातात मृत्यू
वडोद बाजार - भालगाव फाटा (ता. फुलंब्री) येथे आयशर टेंपो, दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१२) दुपारी चारच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर नथ्थू कांबळे (वय ४०, रा. अंधारी, ता. सिल्लोड) हे दुचाकी (एमएच- २० एजे- ६०६४) वर अंधारी (ता. सिल्लोड) कडे जात असताना, सिल्लोडकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालवाहू आयशर टेंपो (एमएच- ०४ डीके- ३८९२) ने जोराची धडक दिली. हा अपघात भालगाव फाट्याजवळ झाला. यात दुचाकीस्वार  ज्ञानेश्वर नथ्थू कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. वडोदबाजार पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

पडेगावजवळ दुचाकी अपघात पत्नी ठार - पती व मुलगी जखमी

औरंगाबाद - मृत्यूचा सापळाच बनलेल्या पडेगावजवळच्या छावणी परिषदेच्या टोल नाक्‍याजवळ भरधाव लष्करी वाहनाने शनिवारी (ता. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला धडक दिली. यात महिला जागीच ठार, तर पती व मुलगी गंभीर जखमी झाले. 

महावितरणच्या चिकलठाणा सबस्टेशनवर कार्यरत असलेले अविनाश तेजनकर श्रावणी शनिवारनिमित्त सहकुटुंब घृष्णेश्वर आणि भद्रामारुतीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना झालेल्या या अपघातात त्यांची पत्नी दीपिका (वय ३०) ठार झाल्या, तर अविनाश (वय ३५) व तीन वर्षांची मुलगी ईश्वरी जखमी झाले. औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील पडेगाव टोल नाक्‍यासमोरून वाट काढत ते जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या लष्करी वाहनाने तेजनकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे दीपिका रस्त्यावर फेकल्या गेल्या. वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांनी ताबडतोब जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. तर दीपिका यांचा मृतदेह छावणी पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी घाटीत आणला. 

दोन दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या टोल नाक्‍यावरील कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पोलिस निरीक्षक इंदरसिंग बहुरे यांनी ते वाहन लष्कराचेच असल्याचा दुजोरा दिला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक श्री. मिरधे तपास करत आहेत.

पाथ्री येथील अपघातात एक ठार
वडोदबाजार - खुलताबाद येथून भद्रामारुतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या युवकांचा पाथ्री (ता. फुलंब्री) येथील दूध संघासमोर झालेल्या अपघातात एक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शेवता (ता. फुलंब्री) येथील बाबासाहेब आप्पा बेडके व राजू नारायण तुपे हे युवक खुलताबाद येथून दुचाकीवरुन (एमएच २० ईएम ५१६७) परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा पाथ्री गावाजवळ अपघात झाला. 

यात बाबासाहेब बेडके (वय २७) ठार झाले, तर राजू तुपे (वय २१) गंभीर जखमी झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.

Web Title: aurangabad marathwada news 4 death in different accident