जिल्ह्यात ४८ हजार दिव्यांग युनिक आयडीच्या प्रतीक्षेत

योगेश पायघन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

औरंगाबाद - राज्यातील इतर जिल्ह्यांत विविध प्रकारांतील दिव्यांगांना स्वतंत्र ‘युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ (आयडी) मिळत असताना जिल्ह्यात ४८ हजार दिव्यांग सहा महिन्यांपासून प्रतीक्षेतच आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकल्पाची अंमलबजावणी शक्‍य नसल्याचे अपंग आयुक्तांना कळविले आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू होईपर्यंत युनिक आयडी देण्याचे काम होण्याची शक्‍यता दिसत नाही. यात दिव्यांगांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक मिळविण्यासाठी घाटीला आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना एकच पासवर्ड दिल्याने गुप्तता धोक्‍यात आल्याची तांत्रिक अडचण समोर करून चालढकल केल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अपंगांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुभवायला मिळत आहे. घाटी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना स्वतंत्र युजर आयडी मिळाले तरी या प्रकल्पाला अद्याप सुरवात होऊ शकली नाही. तर सातशे ते हजार अपंग प्रमाणपत्र, रेल्वे सवलत, तंदुरुस्त प्रमाणपत्र, वैद्यकीय मंडळांतर्गत तपासण्या आदींचा भार असल्याने घाटीत सध्या वैश्‍विक ओळखपत्र देण्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी होऊ शकत नसल्याचे अपंग आयुक्तांना कळविले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांमुळे होणाऱ्या दिरंगाईमुळे दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

तसेच राज्यात सर्व जिल्ह्यात ही जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक पार पाडत असल्याने औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सुपूर्द करण्याची मागणी घाटीने केली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

घाटीने जबाबदारी झटकू नये
अपंग प्रमाणपत्र घाटी देते. युनिक आयडीसुद्धा त्यांनीच देणे अपेक्षित आहे. घाटीने जबाबदारी झटकून चालणार नाही. वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड तालुक्‍यांत अपंग प्रमाणपत्राची सुविधा करण्यात आली असून त्याच वेळी युनिक आयडी देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

अपंगांसाठी महत्त्वाचा दस्तावेज 
४० टक्‍क्‍यांपर्यंतच्या दिव्यांगांना पिवळा, ४० ते  ७० टक्‍क्‍यांपर्यंत निळा, ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांना लाल रंगाचे ओळखपत्र दिले जाईल. रंगीत युनिक कार्ड हे आधार कार्डच्या धर्तीवर देशभरात एकच असेल. हे कार्ड दाखवून अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशभरात कोठेही घेता येतील. आधार कार्ड युनिक कार्डशी लिंक असेल. हे एकच कार्ड महत्त्वाचा दस्तावेज ठरणार असल्याचे केंद्र शासनाकडून स्पष्ट केलेले आहे.

Web Title: aurangabad marathwada news 48 thousand handicapped waiting for unique ID