पाच कोटींच्या कामांचा सस्पेन्स संपेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अत्यावश्‍यकतेच्या नावाखाली आयुक्तांचे विशेषाधिकार वापरून करण्यात आलेल्या पाच कोटींहून अधिक रकमेच्या कामांचा सस्पेन्स कायम आहे. स्थायी समिती सभापतींनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊन तीन महिने उलटले आहेत; मात्र चौकशीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. पाइपलाइन टाकणे, मुख्य पाइपलाइनसह शहरातील गळत्या थांबविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, साहित्य खरेदी, टॅंकर सेवा अशा कामांचा यात समावेश आहे; मात्र ही कामे करताना प्रत्येक काम अत्यावश्‍यक दाखवून करण्यात आले आहेत. त्यासाठी आयुक्तांचे विशेषाधिकार (कलम ६७-३ सी) वापरण्यात आले आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामनिहाय चौकशी केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गडबडी आढळून आल्याने त्यांनी या कामांची चौकशी करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. तीन महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली नाही, त्यामुळे सुमारे पाच कोटींच्या कामांचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, विशेषाधिकार वापरण्यावर आक्षेप घेतल्यानंतर ही पद्धत काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागात झालेल्या कामांची मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. त्याला तीन महिने उलटले आहेत. अद्याप चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामांचे गौडबंगाल कायम आहे. 
- गजानन बारवाल, सभापती स्थायी समिती

Web Title: aurangabad marathwada news 5 crore work suspense