वनरक्षकाने रस्त्यावरत घेतली ५० हजारांची लाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - अटक न करता जप्त जेसीबी मशीन सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना वनरक्षकाला पकडण्यात आले. धामनगाव ते चिंचोली रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी (ता. १६) ही कारवाई केली. रामेश्‍वर रंगनाथ डुकरे (वय २६) असे पकडलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.

औरंगाबाद - अटक न करता जप्त जेसीबी मशीन सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना वनरक्षकाला पकडण्यात आले. धामनगाव ते चिंचोली रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी (ता. १६) ही कारवाई केली. रामेश्‍वर रंगनाथ डुकरे (वय २६) असे पकडलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांचा चालक दत्ता हा दुचाकीने बाभूळगाव येथे जेसीबीवर कामाला येत होता. वनविभागातील श्रीमती तुपे व वॉचमन साबळे यांनी त्याला अडविले. ‘‘आम्हाला न विचारता जेसीबीने रस्ता का केला’’ याचा जाब त्यांनी विचारला. त्या वेळी दत्ता यांनी आपण रस्ता केला नसल्याचे सांगितले. यावरून तिघांत वाद झाला. प्रकरण फुलंब्री पोलिस ठाण्यापर्यंत गेले. तुपे यांच्या तक्रारीनुसार, चालक दत्ता यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर रामेश्‍वर डुकरे यांनी लाचेच्या प्रकरणातील तक्रारदार असलेले दत्ता यांच्या मालकाला फोन केला. ‘‘परवानगी न घेता वनखात्याच्या हद्दीत रस्ता कसा केला. जंगल कायद्यानुसार, तुमच्यावर कारवाई झाली.’’ असे सांगून या प्रकरणात अटक करून जेसीबी मशीन जप्त करणार आहोत, अशी भीती घातली. त्यानंतर डुकरेने फोन कट केला.वनरक्षक डुकरेने परत १४ जुलैला दत्ता यांच्या मालकाला फोन केला व चिंचोली येथील नर्सरीमध्ये येऊन भेटण्याचे सांगितले. यावर ते डुकरेला भेटण्यासाठी गेले. त्या वेळी परिक्षेत्र अधिकाऱ्याला आपण भेटून आलो. जेसीबीची जप्ती व अटक टाळायची असेल तर दोन बाँडपेपर आणून साठ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी त्याने केली. याविरोधात दत्ता यांच्या मालकाने ‘लाचलुचपत’ विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर ‘लाचलुचपत’च्या पथकाने लाचेची पडताळणी केली असता डुकरेने साठ हजारांची मागणी केली व तडजोडीअंती पन्नास हजार रुपये आणून देण्याचे सांगितले. यानंतर डुकरेला पथकाने रंगेहाथ पकडले. 
ही कारवाई निरीक्षक विकास पाटील, प्रमोद पाटील, रवींद्र देशमुख, संदीप आव्हाळे, संतोष जोशी, बाळासाहेब राठोड, दिलीपसिंग राजपूत यांनी केली. संशयित आरोपीविरुद्ध फुलंब्री ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: aurangabad marathwada news 50000 bribe receive forest security