हजारो गुंतवणूकदारांची नऊ कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटून गुंतवणूकदारांना तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार शहरात उघड झाला. सुमारे दोन ते तीन हजार जणांची ही फसवणूक असून, या प्रकरणात संशयितांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२२) गुन्ह्याची नोंद झाली. 

औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटून गुंतवणूकदारांना तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार शहरात उघड झाला. सुमारे दोन ते तीन हजार जणांची ही फसवणूक असून, या प्रकरणात संशयितांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२२) गुन्ह्याची नोंद झाली. 

आर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल माधवसिंग कुशवाह (रा. गगन विहार, दिल्ली ह. मु. राजस्थान), शिवराम माधवसिंग कुशवाह (रा. ग्वालियार, मध्यप्रदेश, ह. मु. राजस्थान), बालकिशन माधवसिंग कुशवाह (रा. गगन विहार, दिल्ली, ह. मु. राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. याशिवाय इतर आठ संचालक सभासद, पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केली. बन्सीलालनगर येथे विशाल मेगा मार्केटजवळ २०१० ला कंपनीचा चेअरमन बनवारीलाल कुशवाह व त्याच्या साथीदारांनी गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटली. यानंतर ओळख वाढवून त्यांनी गुंतवणुकीसाठी नागरिकांशी संपर्क सुरू केला. त्यांना कार्यालयात बोलावले. कंपनीच्या विविध योजना समजावून सांगत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. याला भुलून नागरिकांनी कंपनीत गुंतवणूक केली. वाहनचालक असलेले अशोक बापूराव कुऱ्हे (वय ३८, रा. बीडबायपास) यांनी नऊ सप्टेबर २०१० ला कंपनीच्या विस्तार अधिकाऱ्याने बोलावून घेतले. त्यांना कंपनीच्या योजना समजावून सांगितल्या. आर्थिक लाभ मिळेल, या आमिषाने कुऱ्हे यांनी एकूण एक लाख दहा हजार रुपये योजनेत गुंतवले; मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. या प्रकरणात त्यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीत नमूद केले, की आमिषाला बळी पडून संतोष सरोदे (रा. केसापुरी), सुरेश कदम (रा. पिंपरखेडा, ता. जि. औरंगाबाद) यांच्यासह सुमारे दोन ते तीन हजार जणांनी गुंतवणूक केली. ही रक्कम अंदाजे नऊ कोटी रुपये एवढी आहे. यात आर्थिक गुन्हेशाखेने तपास केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळातील संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.

मोठ्या व्याजाचे आमिष
पहिल्या योजनेनुसार पन्नास हजार रुपयांवर साडेसात हजार रुपये व्याज मिळणार होते. तसेच सहा वर्षांनी मूळ रक्कम परत दिली जाणार होती. दुसऱ्या योजनेत दरवर्षी दहा हजार रुपयेप्रमाणे सहा वर्षांत साठ हजार रुपये कुऱ्हे यांनी भरले. त्यांना मुदतीनंतर ९३ हजार रुपये कंपनी देणार होती; परंतु त्यांची मूळ रक्कमही कंपनीने दिली नाही.

Web Title: aurangabad marathwada news 9 crore rupees cheating