महापालिकेच्या तिजोरीला पडणार नऊ कोटींचा ‘खड्डा’

माधव इतबारे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

शहरातील रस्ते गेले खड्ड्यांत, पॅचवर्कसाठी ‘कोटी-कोटीं’ची उड्डाणे

शहरातील रस्ते गेले खड्ड्यांत, पॅचवर्कसाठी ‘कोटी-कोटीं’ची उड्डाणे

औरंगाबाद - पावसाचा यंदा म्हणावा तेवढा जोर नसला तरी शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची स्थिती कायम आहे. सिमेंट रस्ते वगळता जुन्या व नव्या शहरातील जीवघेण्या खड्ड्यांतून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अनेकांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. मात्र, नागरिकांच्या त्रासाबाबत सोयरसुतक नसलेले महापालिका अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. तर दुसरीकडे पावसाळा संपताच पॅचवर्कच्या नावाखाली नऊ कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. पॅचकवर्कच्या फायलींची ‘कोटी-कोटीं’ची उड्डाणे सुरू असल्याने महापालिका तिजोरीला देखील ‘खड्डे’ पडत आहेत.

राज्याची पर्यटन राजधानी असे बिरुद मिरविणाऱ्या औरंगाबाद शहराची रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून नाचक्की होत आहे. शहर परिसरातील वेरूळ-अजिंठा लेणी, देवगिरी किल्ला, बिबी-का-मकबरा, पाणचक्की ही ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देश-विदेशांतून दरवर्षी लाखो पर्यटक शहरात येतात. त्यांना पर्यटनासोबतच शहरातील खड्ड्यांचे देखील ‘दर्शन’ पॅकेज स्वरूपात मिळते. शहरात कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक दिग्गजांनी जाहीर कार्यक्रमांमधून खड्ड्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे. एवढी अपकीर्ती झाल्यानंतरही खड्ड्यांतून शहरवासीयांची अद्याप मुक्तता झालेली नाही. नव्याने झालेले सिमेंट रस्ते वगळता जुन्या व नव्या शहरातील डांबरी रस्ते खड्ड्यांनी व्यापून गेले आहेत. अनेक रस्त्यांवर चालणेही अवघड झाले आहे. ज्या रस्त्यांना वर्षानुवर्षे डांबर लागलेले नाही व ज्या रस्त्यांवर वारंवार उधळपट्टी केली जाते त्यांची अवस्था सारखीच आहे. 
विशेषतः शहर परिसरात असलेल्या अठरा खेड्यांतील नागरिकांचे बेहाल आहेत. हर्सूल, नारेगाव, सुरेवाडी, मिसारवाडी, सातारा-देवळाई परिसर, पडेगाव, मिटमिटा या भागांत अद्याप रस्त्यांवर खडीही टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल होऊन अक्षरक्षः दलदल तयार होते. त्यामुळे या भागातील लाखो नागरिकांना आजही एखाद्या दुर्गम खेड्याप्रमाणे जीवन जगावे लागत आहे. 

पाऊस करतो ‘पोलखोल’
गणेशोत्सवाच्या काळात नगरसेवकांनी ओरड करताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुरूम व खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्यात दोन मोठे पाऊस झाल्यानंतर महापालिका उघडी पडली. मुरुमासह खडी वाहून गेल्याने पुन्हा खड्ड्यांचा त्रास सुरू झाला आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासनाची पाऊस ‘पोलखोल’ करतो.

पैशाच्या उधळपट्टीसाठी निविदा
रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. गतवर्षी तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी पॅचवर्कवर होणारी उधळपट्टी थांबविली होती. पॅचवर्कसाठी वापरल्या जाणाऱ्या निधीतून रस्त्यांचे पूर्णपणे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची कोंडी झाली होती. यंदा मात्र एका प्रभागासाठी तब्बल एक कोटी असा नऊ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला असून, निविदा मंजूर करून हा निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

बेशरमाची झाडे लावून निषेध 
वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्यामुळे हर्सूल परिसरातील नागरिक, विद्यार्थांनी खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून निषेध केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही खड्ड्यांवर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतरही महापालिकेला जाग आलेली नाही.

काय म्हणतात नगरसेवक

चालणेही अवघड
शहर परिसरातील १८ खेडी महापालिकेत समाविष्ट होऊन २० वर्षांहून अधिक काळ उलटला. त्यावेळी हर्सूल हा एकमेव वॉर्ड होता. आज या एका वॉर्डाचे आठ वॉर्ड झाले. नागरी वसाहती वाढल्या मात्र आमच्या भागात रस्ते झाले नाहीत. बजेटमध्ये रस्त्यांसाठी तरतूद करताना दुजाभाव केला जात होता. त्यामुळे सुरेवाडीसह इतर भागातील नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले आहे.
- सीताराम सुरे, नगरसेवक, शिवसेना

ठेकेदार, अधिकाऱ्यांची मिलीभगत 
गणेशोत्सवाच्या काळात शहरात मुरूम-खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे मुरूम, खडी वाहून गेल्यामुळे पुन्हा खड्डे उघडे पडले. अधिकारी-कंत्राटदारांची मिलीभगत असून, दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. मुरूम-खडीची बिले न काढता डांबरीकरणाचे पॅचवर्क केल्यानंतरच या कंत्राटदारांची बिले देण्यात यावीत. 
- भाऊसाहेब जगताप, गटनेता, काँग्रेस

का पडतात खड्डे?
डांबर आणि पाणी यांचे वैर असून, पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर खड्डे पडतात. 
डांबरी रस्ता बनविताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उतार असणे गरजेचे आहे. मात्र, कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करतात. 
पावसाच्या पाण्यातही खड्डे बुजविता यावेत म्हणून कार्बनकोर, कोल्डमिक्‍स, हॉटमिक्‍स अशा विविध तंत्रांचा वापर केला जातो. मात्र, हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे.
कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. डांबराचे प्रमाण कमी झाल्यास खडी उखडून पावसाळ्यात वाहून जाते. 
खड्ड्यांचा योग्य आकार व खोली वाढवून काम केल्यास पुन्हा लवकर खड्डे पडत नाहीत. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जाते.

Web Title: aurangabad marathwada news 9 crore rupees load on municipal safe