अभय योजनेमुळे वसुलीला ब्रेक!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

औरंगाबाद - करायला गेले एक आणि झाले उलटेच, असा प्रकार यंदा महापालिकेच्या बाबतीत घडला. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला दरवर्षी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते; मात्र यंदा सर्वत्र शुकशुकाट आढळला. दंडापोटी तब्बल ७५ टक्के सूट देण्याची अभय योजना महापालिकेने जाहीर केल्यामुळे मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली. त्यामुळे गतवर्षीपेक्षा आठ कोटींनी कमी म्हणजेच फक्त ८० कोटींची वसुली यंदा झाली.

शहरात मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षात जुन्या थकबाकीसह ४३३ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी होती. तर, ३९० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र यंदा महापालिकेची वसुली पूर्णपणे ढेपाळली. मार्चमध्ये केवळ १८ टक्के एवढी वसुली होती.

दरम्यान, कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर वॉर्ड अधिकाऱ्यांनीदेखील वसुलीकडे दुर्लक्ष केले. त्यात भर पडली अभय योजनेची. मात्र, ही योजना एक एप्रिलपासून सुरू होणार असल्यामुळे मार्चच्या टप्प्यातदेखील कोणी कर भरला नाही. दरवर्षी आर्थिक वर्ष संपताना नागरिक रांगा लावून कर भरायचे. यंदा तर ३१ मार्चला महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांत शुकशुकाट आढळला. विशेष म्हणजे रात्री १० पर्यंत वॉर्ड कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. ३० मार्चपर्यंत मालमत्ता करापोटी ७७.५० कोटी रुपये जमा झाले होते. हा आकडा ८० कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी ८७ कोटी रुपये जमा झाले होते.

एक एप्रिलपासून ‘अभय’ 
मालमत्ताकराची सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी एक ते ३१ एप्रिलदरम्यान अभय योजना राबविण्यात येईल. त्यात थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्याला व्याज व दंडामध्ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news abhay scheme recovery stop