विमानतळ विस्तारीकरणाचा महिनाभरात होणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमिनीचे संपादन आणि मुकुंदवाडी, मूर्तिजापूर व चिकलठाणा येथील शेतकऱ्यांना द्यायचा जमिनीचा मोबदला यासह सर्व प्रश्‍न एका महिन्याच्या आत मार्गी लावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२२) दिले. 

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमिनीचे संपादन आणि मुकुंदवाडी, मूर्तिजापूर व चिकलठाणा येथील शेतकऱ्यांना द्यायचा जमिनीचा मोबदला यासह सर्व प्रश्‍न एका महिन्याच्या आत मार्गी लावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२२) दिले. 

विस्तारीकरणासंदर्भात मुंबईत विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सर्वाजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या प्रश्‍नांवर मार्ग काढावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीमुळे येत्या महिनाभरात विमानतळ विस्तारीकरणाच्या हालचालींना वेग येण्याची शक्‍यता आहे. डीएमआयसीला विमानतळ विस्तारीकरणामुळे फायदा होईल तसेच आंतरराष्ट्रीय एअर कार्गो आणि आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू होऊन हवाई कनेक्‍टिव्हिटी वाढणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मोबदल्यासह इतर प्रलंबित प्रश्‍न महिनाभरात मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साडेबारा टक्‍के भाग विकसित करण्यावर चर्चा झाली.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी

विस्तारीकरणाचा प्रवास 
विमानतळ विस्तारीकरणासाठी २००७ पासून प्रयत्न सुरू आहेत. 
जानेवारी २०१६ मध्ये राज्य सरकारची विस्तारीकरणाला मंजुरी.
१८२ एकर जमिनीवर होणार धावपट्टीचा विस्तार.  
५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित.
नोव्हेंबर २०१६ मध्ये झाले सर्वेक्षण, ८०० घरे होणार बाधित.  

असा होणार विस्तार 
विस्तारीकरणात धावपट्टी २७०० फुटांनी वाढविण्यात येणार. 
बोइंग ७७७-३००, एअरबस ए-३३० विमान उतरण्याची सुविधा
धावपट्टीच्या शेवटपर्यंत दिवे लावले जाणार.

Web Title: aurangabad marathwada news airport development decission