प्रेषितांच्या संदेशानुसार मानवतेच्या सेवेचे व्रत

औरंगाबाद - पयामे इन्सानियतच्या बायजीपुरा येथील दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिला.
औरंगाबाद - पयामे इन्सानियतच्या बायजीपुरा येथील दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिला.

औरंगाबाद - प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी समता, बंधुता, न्याय, मानवतेवर आधारित व्यवस्था निर्माण केली. प्रेषितांनी सदैव गरीब, गरजूंना मदत केली. त्यांनी दिलेल्या संदेशानुसार अनेक संस्था, संघटना समाजसेवेचे व्रत अंगीकारून आपले कार्य जोमाने पुढे नेत आहेत. "ऑल इंडिया पयामे इन्सानियत'च्या माध्यमातून औरंगाबादमध्ये असेच समाजसेवेच व्रत सुरू आहे. गरिबांसाठी आरोग्य सेवेसह गरजूंच्या शिक्षणासाठी सढळ हस्ते मदतीचा वसा या संस्थेने घेतला आहे. मदतीसाठी आलेले कोणत्या जाती-धर्माचे आहेत, हे बघितले जात नाही. त्यांचे कार्य केवळ मानवतेवर आधारित आहे.

"ऑल इंडिया पयामे इन्सानियत'ची सुरवात 1972 मध्ये मौलाना अली मिया यांनी केली. समाजसेवा, हिंदू- मुस्लिम भाईचारा हा त्यामागील उद्देश. 1988 मध्ये या संस्थेतर्फे समाजसेवेच्या उपक्रमांना औरंगाबादमध्ये सुरवात झाली. 2005 पासून या कार्याचा विस्तार करून सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यावर भर देण्यात आला. संस्थेतर्फे औरंगाबादेत आरोग्य, शैक्षणिक सुविधांसाठी काम केले जाते. बायजीपुरा भागात स्थापन केलेल्या दवाखान्यात गरीब, गरजूंसाठी अल्प शुल्कात आरोग्य सुविधा दिल्या जातात. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासणी केली जाते. कमी दरात औषधे दिली जातात. दररोज शंभरावर रुग्ण तपासणीसाठी येतात. त्याशिवाय शहरी, ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेतली जातात. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गरीब रुग्णांसाठी आठवड्यातून दोन दिवस मोफत नाश्‍ता, औषधांचे वाटप केले जाते. रुग्णवाहिकेचीही सेवा उपलब्ध करून दिली जाते. दर चार महिन्यांनी रुक्तदान शिबिर घेतले जाते.

स्वतःची कामे सांभाळून समाजकार्य
स्वतःची कामे, नोकरी- व्यवसाय सांभाळून या संस्थेतील तरुणांनी समाजसेवेचे हे व्रत अंगीकारले आहे. त्यासाठी कसलेही मानधन घेत नाहीत. समाजातील दानशूरांच्या मदतीने त्यांचे हे व्रत सुरूच आहे. शिक्षणासाठी गरजू मुलांना आवश्‍यक मदतीसाठीही ते तत्पर असतात. मदतीसाठी कुणी फोन केला तरी लगेचच दखल घेतात. या संस्थेसाठी डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. मकदुम फारुकी, डॉ. प्रदीप खडके, डॉ. अब्दुल वहीद खान, लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, मौलाना मोईजोद्दीन फारुकी, जकीउद्दीन सिद्दिकी, प्रदीप बोरा, काशिनाथ चौधरी, मौलाना जुनेद फारुकी यांचे मार्गदर्शन मिळते. हुजेफा खान, अमित लोणकर, अमनदीपसिंह, अब्दुल हई, शुभम दांडेकर, मो. एतेशाम हे मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

आम्ही सुरू केलेली सेवा सर्व जाती-धर्मांसाठी आहे. आमच्याकडे सर्व स्तरांतील गरजू उपचारासाठी येतात. त्यांना अतिशय कमी किमतीत ही सुविधा दिली जाते. अनेक अडचणींवर मात करून हे सेवाकार्य केले जाते.
- नजीब फैसल

मदतीसाठी अनेक जण संपर्क करतात. त्यांना आम्ही आमच्या परीने मदत उपलब्ध करून देतो. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन तेथील गरीब रुग्णांना मदत करण्याचे कार्य नियमित सुरू असते. गरिबांना ब्लॅंकेटचेही वाटप करतो.
- हुजैफा खान

गोवंडीमध्ये विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण
मुंबई - गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेतील अडथळे दूर करण्याचा वसा गोवंडीतील सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनीच उचलला आहे. गोवंडी परिसरातील उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी शाळकरी विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शिक्षणाआड येणाऱ्या आर्थिक अडचणीही सोडवतात.
ंमुंबईतील गोवंडी शिवाजीनगर हा कष्टकऱ्यांचा परिसर. बेठबिगारी, कचरा वेचून घर चालविणाऱ्यांची संख्या या परिसरात मोठी आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत मुलांना शिकण्यासाठी पुस्तकेही मिळत नाहीत. यावर गोवंडी एज्युकेशन यूथ ट्रस्टने पर्याय शोधला. ही संस्था कोण्या राजकीय कार्यकर्त्यांची नसून, गोवंडी शिवाजीनगरमधील उच्चशिक्षण घेणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना रोज सायंकाळी मार्गदर्शन केले जाते. अभ्यासक्रमातील त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात.

पहिलीपासून बारावीपर्यंतच्या मुला-मुलींचे वर्ग हे तरुण रोज सायंकाळी घेतात. गरजू विद्यार्थ्यांना वर्गणी गोळा करून पुस्तके घेऊन देतो, असे अहमद शेख यांनी सांगितले. अहमद हे एमबीए करीत आहेत. ""गरजू विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचीही परिस्थिती चांगली नाही. पण, काटकसरीतून वाचलेल्या पैशांचा वापर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करतो. आमच्यातील काहींना नोकऱ्या लागतील. त्या वेळी पगारातील काही रक्कम दर महिन्याला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे ते सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com