औरंगाबाद बसपोर्टच्या निविदेला अखेर मुदतवाढ

औरंगाबाद बसपोर्टच्या निविदेला अखेर मुदतवाढ

औरंगाबाद - राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बसपोर्ट उभारणीसाठीच्या निविदाप्रक्रियेला मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून यास मुदतवाढ देण्यात आली. यात औरंगाबाद, बोरिवली, पुणे (शिवाजीनगर), नागपूरच्या बसपोर्टच्या निविदेची मुदत आता 11 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे बंद पडलेल्या बसपोर्टच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बसपोर्ट तयार करून आधुनिक सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात 13 बसपोर्ट उभारण्याची घोषणा चार जानेवारी 2016 रोजी परिवहनमंत्र्यांनी औरंगाबादेत केली होती. यात मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबाद येथील कामांचा समावेश आहे. चार ऑगस्ट 2016 ला मुंबईच्या दारशॉं कंपनीच्या सदस्यांनी "मध्यवर्ती'चे डिझाईन तयार केले होते. एक फेब्रुवारीला कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 30 मार्चला ही निविदा उघडण्यात येणार होती. मात्र यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात आली. यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, 11 जुलैची मुदत देण्यात आली आहे. 14 जुलैला निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली.

राज्यातील हे बसपोर्ट पीएसपी (प्रायव्हेट सेक्‍टर पार्टीसिपेशन) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. हे काम घेणाऱ्या कंपनीला 32 कोटी 90 लाखांची अनामत भरावी लागणार आहे. बसपोर्टच्या भव्य इमारतीचे तळमजला आणि पहिला मजला असे स्वरूप राहणार आहे.

तळमजल्यावर प्लॅटफॉर्म, केंद्रीय प्रतीक्षा हॉल, अनलोडिंग प्लॅटफॉर्म, सर्वसाधारण प्रवासी क्षेत्र, बस स्थानक प्रमुख कार्यालय, कंट्रोलर व चौकशी केंद्र, पोलिस केबिन, पुरुष व महिलांसाठी 3-3 स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह, प्रथम श्रेणीतील प्रवाशासांठी प्रतीक्षालय, चालक-वाहकासांठी स्वतंत्र प्रतीक्षालय व स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वतंत्र खोली, औषधालय, सर्वसामान्य प्रतीक्षालय, रिटेल शॉप, फूड कोर्ट, फूड काउंटर, किचन, लॉबी, डेपो मॅनेजर केबिन, पार्सल रूम, रेस्ट रूम, स्टोअरेज, हॉल, प्रशासकीय कार्यालय, व्हीआयपी रूम, कॉन्फरन्स रूम, कॅश सेक्‍शन यांचा समावेश आहे. हे सर्व बांधकाम तीन हजार 777 स्क्वेअर मीटरमध्ये असणार आहे; तर पहिला मजल्यावर
प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, बसण्यासाठी आसनव्यवस्था, स्टोरेज व रेकॉर्ड रूम, कर्मचारी निवासस्थान आणि विश्रामगृह, डेपो मॅनेजर यांच्यासह 10 फ्लॅट्‌स, चार गेस्ट हाउस अशी सुविधा असेल. हे बांधकाम दोन हजार 85 स्क्वेअर मीटरमध्ये करण्यात येणार आहे.

मार्चमध्ये बसपोर्टच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र ठेकेदारांनी शंका व्यक्त केल्यामुळे कोणीही पुढे आले नाही. याच अडचणी आम्ही जाणून घेतल्या आहेत. आता पुन्हा निविदा काढण्यात आल्या असून, 11 जुलैपर्यंत त्या स्वीकरण्यात येणार आहेत. 24 जुलैला या निविदा उघडणार आहोत. त्यानंतर लगेच पुढील कामे करण्यात येतील.
- रणजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी

- अल्प प्रतिसाद बघता वाढवली तारीख; 11 जुलैपर्यंत मुदत
- 35 हजार स्क्वेअर मीटरमध्ये उभारणार मध्यवर्ती बसस्थानक
- पीएसपी तत्त्वावर होणार काम
- कमर्शियल शॉप, औषधालय, उपाहारगृहासह आधुनिक प्रतीक्षालयांचा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com