औरंगाबाद-पुणे प्रवास अर्धा तास लवकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नगरमध्ये होणार दीड कि.मी.चा एलिव्हेटेड मार्ग

नगरमध्ये होणार दीड कि.मी.चा एलिव्हेटेड मार्ग
औरंगाबाद - औरंगाबादेतून पुण्याला जाण्यासाठी लागणारा सुमारे पाच तासांचा अवधी आता किमान अर्ध्या तासाने घटणार आहे. नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दीड किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड (रस्त्यावरून रस्ता) तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहने या रस्त्यारून थेट शहराबाहेर जाणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे.

औरंगाबाद-पुणे महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. यात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी ट्रक आणि मल्टी ऍक्‍सल वाहनांची संख्या भरमसाट आहे. ही वाहतूक नगर शहराच्या मध्यवस्तीतून जाते. त्यामुळे शहरात अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. यातून वेळेसोबतच इंधनाचेही मोठे नुकसान होते. आता ही वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावले उचलली आहेत.

त्यानुसार नगर शहरातून सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान सुमारे दीड किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे. वाहतूक थेट नगरबाहेर जाणार असल्याने औरंगाबाद-पुणे प्रवासाला लागणारा पाच तासांचा अवधीही किमान अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

"डीपीआर'ला लागणार तीन ते सहा महिने
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे (एनएचएआय) तयार करण्यात येणाऱ्या या एलिव्हेटेड रस्त्याच्या उभारणीवर गेल्या आठवड्यात नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी बैठक घेतली. या एलिव्हेटेड रस्त्याच्या प्रकल्पाबाबत त्यांनी माहिती घेतली होती. या प्रकल्पाचा "डीपीआर' तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, तीन ते सहा महिन्यांत हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. "डीपीआर' तयार झाल्यानंतर या एलिव्हेटेड रस्त्याच्या पुढील कामांना सुरवात होणे अपेक्षित आहे.

बायपास चौपदरीकरणासाठी 750 कोटी
नगर शहरातून न येता वाहने बाहेरच्या बाहेर जाण्यासाठी सध्या दुपदरी बायपास अस्तित्वात आहे. खराब परिस्थितीत असलेल्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. हे कामही आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येणार आहे. या कामाचाही आढावा घेण्यात आला. त्यासाठी तब्बल साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नगर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी थांबविण्यासाठी सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. त्याच्या डीपीआरचे काम तीन ते सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्याचा खर्च अद्याप ठरला नसला तरी बायपासच्या चौपदरीकरणासाठी साडेसातशे कोटी लागणार आहेत.
- यशवंत घोटकर (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, औरंगाबाद)
फोटो ः नकाशा, घोटकर

Web Title: aurangabad marathwada news aurangabad-pune journey 0.5 hr early