शहराच्या अविरत पाणीपुरवठ्यासाठी विद्युत वाहिनीवर स्वयंचलित यंत्रणा

शहराच्या अविरत पाणीपुरवठ्यासाठी विद्युत वाहिनीवर स्वयंचलित यंत्रणा

वाहिनीवर बिघाड झाला, तर आपोआप दुसरी वाहिनी होणार सुरू  

औरंगाबाद - महापालिकेचे जायकवाडी-फारोळा येथे पाणी उपसा केंद्र आहे. या दोन्ही उपकेंद्रास महावितरणतर्फे दोन ३३ केव्हीमार्फत विद्युत पुरवठा केला जातो. या ठिकाणी महापालिकेने रिमिनिंग युनिट बसविलेले नसल्याने, एका विद्युत वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या वाहिनीवरून विद्युत पुरवठा घेण्यासाठी विलंब होतो. परिणामी, शहराला निर्जळीचा सामना करावा लागतो, म्हणून गणेशोत्सवानंतर जायकवाडी येथे हे स्वयंचलित संयंत्र बसविले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शहराला जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा अविरतपणे सुरू राहावा यासाठी महापालिकेने जायकवाडी आणि फारोळा येथील पाणी उपसा केंद्राच्या ठिकाणी स्वयंचलित विद्युत यंत्र (रिमिनिंग युनिट) बसविले; तर वारंवार विद्युत यंत्रणेतील किरकोळ बिघाडाने पाणीपुरवठा खंडित होणार नाही. या एका स्वंयचलित विद्युत यंत्रासाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येणार आहे. 

स्वयंचलित विद्युत यंत्र (रिमिनिंग युनिट) नसल्याने एका विद्युत वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या वाहिनीवरून विद्युत पुरवठा घेण्यासाठी विलंब लागतो; मात्र स्वयंचलित विद्युत यंत्र बसवले, तर एका विद्युत वाहिनीतील पुरवठा बंद झाला तर तो आपोआप स्वयंचलित यंत्रामार्फत दुसऱ्या वाहिनीवरून सुरू होऊन पाण्याचा उपसा कायम सुरू राहतो. यासाठीचे अंदाजपत्रक महापालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

स्पॉट कनेक्‍शन योजना
राहुलनगर, आंबेडकरनगर , सिद्धार्थनगर या भागातील नगरसेवकांना सोबत घेऊन वीज चोरी करू नये यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे थकबाकी नाही, त्यांना स्पॉट कनेक्‍शन देण्याची योजना सुरू केल्याचे श्री. गणेशकर यांनी सांगितले. 

गणेशोत्सवासाठी महावितरण सज्ज 
गणेशोत्सव मंडळासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवच्या काळात अखंडित वीजपुरवठा देण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळाला घरगुती वीज दरापेक्षाही कमी दर आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमानुसार वीज कनेक्‍शन घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

साडेपाचशे जणांवर गुन्हे 
महावितरणने १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान औरंगाबाद परिमंडळाच्या अंतर्गत तीन हजार २३४ वीज चोऱ्या पकडल्या असून, वीज चोरी करणाऱ्या ५५८ जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शहरातील आंबेडकरनगर, सिद्धार्थनगर भागात २४७ आकडे काढण्यात आले, तर २७८ जणांचे वीज कनेक्‍शन कापण्यात आले आहे. आंबेडकरनगर-सिद्धार्थनगर या भागात सतत वीज चोरांवर पाळत ठेवण्यात येत आहे. असे असतानाही सोमवारी (ता. २१) पुन्हा दहा जणांनी आकडे टाकून वीज चोरीचा प्रयत्न केला. वीज चोऱ्या उघड करण्यासाठी तेरा अभियंत्यांसह शंभरावर कर्मचारी अविरत मेहनत घेत आहेत. मंगळवारी (ता. २२) रोषणगेट भागात वीज चोरी रोखण्यासाठी पाच पथकामार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन मीटरची तपासणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com