...तर विमान उडू देणार नाही! - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्‍यातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाजूला केला; तर ते मुख्यमंत्री म्हणून अवघ्या पंधरा मिनिटांत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. मात्र त्यांची मानसिकता नाही. "रेल्वे रोको' करूनही सरकारला जाग आली नाही; तर विमान उडू देणार नाही,'' असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला. शेतकऱ्यांना पिकानुसार नव्हे, तर त्याच्या जमिनीच्या भावानुसार (रेडीरेकनर दराने) कर्ज द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

कडू म्हणाले, 'अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे; तर सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. अल्पभूधारकमधील अल्प शब्द काढा. कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांना कर्जमाफीतून वगळण्यास हरकत नाही. मात्र जमीन किती त्यावर कर्जमाफी ठरवू नका. कसायापेक्षा हे सरकार भयंकर आहे, कसाई चार दोन जनावरे कापतो. पण हे सरकार एक निर्णय घेऊन लाखो शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करते. तुरीच्या बाबतीत सरकारने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करून टाकले. हे सरकार तर कलम कसाई आहे.''

'नाशिक येथे सुकाणू समितीची बैठक झाली. राज्यभरातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर 12 जुलैला धरणे आंदोलन आणि 13 जुलैला राज्यभर "रस्ता रोको' व "रेल रोको' करण्याचा निर्णय समितीने घेतला. मात्र त्यांनतरही सरकारला जाग आली नाही, तर विमान उडू देणार नाही, तसेही अर्धे लुटारू विमानानेच प्रवास करतात,'' अशी टिप्पणीही त्यांनी जोडली.

Web Title: aurangabad marathwada news bacchu kadu warning