मोफत पुस्तके मिळाली, गणवेशाला बॅंक खात्याचा अडसर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

मराठवाड्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची स्थिती, खात्याच्या अटीमुळे निधी पडून

मराठवाड्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची स्थिती, खात्याच्या अटीमुळे निधी पडून

औरंगाबाद - सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत काही किरकोळ अपवाद वगळता मराठवाड्यीताल बहुतांश शाळांत यंदा मोफत पुस्तकांचे वाटप झाले आहे. गणवेशाचा घोळ मात्र कायम आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शंभर टक्के मुली, अनुसूचित जाती-जमाती व दारिद्य्ररेषेखालील मुलांना शासनातर्फे मोफत गणवेश दिले जातात. या वर्षापासून शासनाने गणवेशाची रक्कम देण्याचे ठरविले. त्यासाठी विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावे बॅंकेत काढण्याच्या सूचना केली. अल्प रकमेसाठी बॅंकेत खाते काढण्यासाठी निरुत्साह, ‘झिरो बॅलन्स’च्या सूचना असूनही काही बॅंकांचा कानाडोळा आदींमुळे जिल्हा परिषदांकडे आलेला निधी पडून आहे.

औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील शाळांना नववीच्या वर्गाची वगळता अन्य इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्‍के पाठ्यपुस्तके मिळाली मात्र गणवेशासाठी पालकांना बॅंकेच्या दारात खाते उघडण्यासाठी तिष्ठत थांबावे लागत आहे. 

गणवेश देण्याऐवजी संबंधितांच्या खात्यावर प्रत्येकी ४०० रुपये जमा करण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांचे खाते उघडल्यानंतर त्यातून बॅंकांना भविष्यात काही फायदाही होत नाही आणि ती खाती पुढे चालूही राहत नाहीत, या शक्‍यतेमुळे राष्ट्रीयीकृत बॅंका झीरो बॅलेन्सवर खाते उघडण्यास तयार नाहीत. तथापि शहरी भागात ६० ते ७० टक्‍के विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडण्यात आली असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांसाठी बॅंकांनी सहकार्य केल्यास शंभर टक्‍के विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडणे शक्‍य होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना तसे निर्देश देण्याची गरज असल्याचे मत शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले. औरंगाबाद शहरातील ३७० शाळांमध्ये १० लाख पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तकांचे वाटप झाले आहे. नववीची पुस्तके शनिवारी (ता.१५) प्राप्त झाल्याने त्यांचे वाटप बाकी असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

परभणी - पुस्तकांचे ८० टक्के वाटप

परभणी - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे अद्याप वाटप झाले नाही, तर केवळ ८० टक्के पुस्तकांचाच पुरवठा झाला आहे.
मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी पाठ्यपुस्तके मागणीपेक्षा कमी आली. त्यामुळे प्रत्येक शाळेला संख्येच्या ८० टक्के प्रमाणातच पुस्तकांचे वाटप झाले. यंदा काही शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढली, तर काही शाळांची कमी झाली. आता शाळास्तरावर जास्तीच्या पुस्तकांचा शोध घेऊन ती वाटपचा प्रयत्न शिक्षक, मुख्याध्यापकांकडून होत आहे.

विद्यार्थी, आईच्या नावे बॅंकेत खाते काढण्याच्या सूचनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही. शून्य बॅंलेन्सचे आदेश असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांचे दुर्लक्ष, अल्प रकमेसाठी खाते काढण्यात पालकांतील निरुत्साह यामुळे खाते उघडली गेली नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांबाबत अशीच स्थिती आहे. त्यामुळे निधी पडून आहे.

नांदेड - खात्याची समस्या

नांदेड - जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळाली असून गणवेशाचा प्रश्न कायम आहे. यावर्षीपासून गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला असला तरी ८५ टक्के विद्यार्थ्यांचे खाते उघडलेले नसल्याने गणवेशाविनाच विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. ४०० रुपयांसाठी पाचशे ते हजार रुपये भरून खाते उघडणे बहुतांश पालकांना शक्‍य नाही. त्यामुळे गणवेशाचा प्रश्न ऐरणीवर आहे.

बीड - आजारापेक्षा इलाज जालीम!

बीड - सर्व शिक्षा अभियानातून वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाचा घोळ महिना झाला तरी संपलेला नाही. एका विद्यार्थ्याला चारशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी बॅंकेत एक हजार रुपये खर्च करून खाते उघडायचे असल्याने ‘रोगापेक्षा इलाज जालीम’ असे म्हणण्याची वेळ गरीब विद्यार्थ्यांवर आली आहे. एससी, एसटी, दारिद्य्ररेषेखालील व सर्व प्रवर्गातील मुलींना सर्व शिक्षा अभियानातून गणवेश वाटपाची योजना आहे. यासाठी जिल्ह्यात एक लाख २४ हजार १७२ लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी चार कोटी ९६ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. जिल्हा परिषदेने गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत सर्व शिक्षण व्यवस्थापन समित्यांना तो वर्ग केला. चारशे रुपयांच्या अनुदानातून हे कपडे खरेदी करण्यासाठी पाचशे ते हजार रुपये भरून खाते उघडायचे असल्याने अडचणी आहेत. काही ठिकाणी शून्य बॅलन्सवर खाते उघडले जात असले, तरी आतापर्यंत गणवेशाचा आकडा सव्वालाखांपैकी २० हजारही झाला नाही.

हिंगोली - साडेतीन कोटी अाले पण...
हिंगोली - जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली तरी गणवेशासाठी बॅंक खात्याचा अडथळा कायम आहे. त्यामुळे ७४ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळालेला साडेतीन कोटींचा निधी पडून आहे. 

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षी उन्हाळ्यामधेच पाठ्यपुस्तके पाठवून त्याचे शाळास्तरावर वाटप झाले होते. जिल्हा परिषद, खासगी अनुदानित अशा सुमारे साडेबाराशे शाळांमधून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप झाली. गणवेशाचा प्रश्‍न कायम आहे. जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या अकरा हजार पाच, अनुसूचित जमातीच्या सहा हजार, दारिद्य्ररेषेखालील सव्वासहा हजार विद्यार्थी, ५१ हजार विद्यार्थिनी अशा एकूण ७४ हजार ७९४ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गत आठवड्यात शासनाकडून साडेतीन कोटींचा निधी मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांचे बॅंकेत संयुक्त खातेच नसल्याने गणवेश वाटपाची अडचण कायम आहे.

Web Title: aurangabad marathwada news bank account problem to school uniform